Bhirkit Trailer Release: 17 जूनला येणार ‘भिरकीट’च्या हास्याचे वादळ, ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
bhirkit Traile Release (Photo Credit - Social Media)

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या 'भिरकीट' (Bhirkit) नावाचे हास्याचे वादळ येत आहे. 'भिरकीट' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच (Bhirkit Trailer) प्रदर्शित झाला असून हे वादळ 17 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा संगीत सोहळा पार पडला. चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस आल्यानंतर आता चित्रपटाबगद्दलची उत्सुकता वाढवणारा ट्रेलरही भेटीला आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला तात्या पाहायला मिळत आहे, ज्यांची सगळ्यांच्या मदतीसाठीची धडपड दिसत आहे. त्यात असे काही घडल्याचे दिसतेय की, त्यातून अवघ्या गावाची दृष्टी बदलते. आता अशी कोणती घटना घडते, ज्यातून हा बदल घडतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. हसवता हसवता मनाला स्पर्शून जाणारा हा चित्रपट आहे.

यात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद, श्रीकांत यादव, मीनल बाळ, शिल्पा ठाकरे, दिप्ती धोत्रे, आर्या घारे, सेवा मोरे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नामदेव मिरकुटे, राधा सागर, अश्विनी बागल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (हे देखील वाचा: Tamasha Live Release Date: संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ झळकणार 15 जुलैला)

चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात," 'भिरकीट' ही गावच्या मातीची कथा आहे. राजकारण, कौटुंबिक नाते, प्रेमकहाणी , विनोद हे संपूर्ण रस या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गाणी तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसाच चित्रपटाला देखील असाच भरभरून प्रेक्षक प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे. ‘भिरकीट’चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असुन संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे.