भारतासह जगातील विविध देशांमध्ये कोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे (Coronavirus Lockdown) उद्योगांची परिस्थिती अतिशय खराब चालली आहे. याचा फटका चित्रपट उद्योगांनाही बसला आहे. सध्या तरी महाराष्ट्र सरकारने काही नियमांसह शुटींगला परवानगी दिली असली तरी, यापूर्वी तयार झालेल्या चित्रपटांचे भविष्य धोक्यात आले आहे. यामुळेच अनेक निर्माते ओटीटी व्यासपीठावर (OTT Platforms) आपले चित्रपट प्रदर्शित करत आहेत. आता अमृता सुभाष (Amruta Subhash), सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि अक्षय कोठारी (Akshar Kothari) यांचा ‘परिणती’ (Parinati) हा मराठी चित्रपटही डिजिटल प्लॅटफॉर्मवर (Digital Platforms) वर प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. ओटीटी व्यासपीठावर प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे.
परिणती हा चित्रपट एक बार डान्सर आणि डॉक्टर यांच्यातील मैत्रीचा इतिहास दाखवणार आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की, लॉक डाऊनमुळे बॉलिवूडच्या बड्या चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे सध्या बाजारात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक चित्रपटांनाही ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावा लागणार आहे. सध्या परिणती चित्रपट ओटीटी व्यासपीठावर प्रदर्शित करण्याविषयीची चर्चा अंतिम टप्प्यात चालू आहे. ही चर्चा सकारात्मक ठरली तर, परिणीती हा पहिला मराठी चित्रपट असेल जो डिजिटल माध्यमावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय बलसराफ यांनी केले असून, परिणतीची निर्मिती अनेक वर्षांपासून कास्टिंग डायरेक्टर असलेले पराग मेहता यांनी केली आहे. (हेही वाचा: आयुष्मान खुरानाच्या तब्बल 5 चित्रपटांचा साऊथमध्ये बनत आहे रिमेक; अभिनेत्याने ‘असा’ व्यक्त केला आनंद)
दरम्यान, सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत, मात्र बहुतेक निर्मात्यांनी चित्रपटांना फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवरच रिलीज करण्यास सुरवात केली आहे. निर्मात्यांच्या या निर्णयाबाबत आधी आयनॉक्स (INOX) व आता पीव्हीआर पिक्चर्सने (PVR Pictures) आपली नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट, ‘गुलाबो सिताबो' आणि विद्या बालनचा 'शकुंतला देवी', अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून, मल्टीप्लेक्सच्या मालकांनी या बदलाबाबत चिंता व्यक्त केली आहे.