De Dhakka 2: तब्बल 11 वर्षांनी महेश मांजरेकर घेऊन येणार दे धक्का 2; मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव घालणार लंडनमध्ये धुमाकूळ
दे धक्का 2 पोस्टर (Photo Credit : Twitter)

मकरंद अनासपुर, शिवाजी साटम आणि सिद्धार्थ जाधव यांची धमाल कॉमेडी आपल्याला 11 वर्षांपूर्वी ‘दे धक्का’ (De Dhakka) या चित्रपटाद्वारे पाहायला मिळाली होती. त्यावेळी हा चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला होता. आता तब्बल 11 वर्षांनी महेश मांजरेकर (Mahesh Manjerkar) या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येत आहेत. नुकतेच ‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) चे भन्नाट पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेते शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आता चक्क कार मध्ये बसलेले दिसत आहेत.

दे धक्का चित्रपटामध्ये 'टमटम'ने फार महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र आता याच्या दुसऱ्या भागात हे सर्वजण कारमध्ये बसलेले दिसत असून, ही कार लंडनच्या रस्त्यावर बंद पडली आहे. आता ही जनता थेट लंडनमध्ये काय धुमाकूळ हे पाहणे मजेशीर असणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर ‘वेलकम टू लंडन’ असे म्हटले आहे. चित्रपटामधील इतर कलाकार कोण असतील ते लवकरच समजेल. हा चित्रपट 3 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, ‘दे धक्का’ हा चित्रपट 2008 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झालेला, हॉलीवूडचा चित्रपट लिटल मिस सनशाइन (Little Miss Sunshine) याच्या पासून प्रेरणा घेऊन बनवला होता. त्यानंतरत कन्नडमध्येही हा चित्रपट तयार केला गेला होता. दे धक्का चित्रपटाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केले होते. आता ‘दे धक्का 2’चे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर करणार आहेत.