अभिनेत्री दिपाली सय्यद यांची पूरग्रस्तांना 5 कोटी रुपयांची मदत; उचलली 1000 मुलींच्या लग्नाची जबाबदारी
अभिनेत्री दिपाली सय्यद (संग्रहित संपादित प्रतिमा)

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये महापुराने थैमान घातले होते. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. सरकार, देवस्थाने, सामाजिक संस्था, नागरिक यांच्याकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये आता एका अभिनेत्रीची भर पडली आहे. अभिनेत्री दिपाली सय्यदने (Dipali Sayyed) 1000 मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली आहे. यासाठी दिपाली सय्यद यांनी एकूण 5 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. नुकतीच सय्यद यांनी कोल्हापूर-सांगली पूरग्रस्त परिसराची पाहणी केली होती.

दिपाली सय्यद यांनी जाहीर केलेल्या मदतीमधून, प्रत्येक मुलीच्या नावाने 50 हजार रूपयांची मुदत ठेव पावती करण्यात येणार आहे. पुढे ही रक्कम त्या मुलीच्या लग्नासाठी वापरण्यात येणार आहे. या मदतीमधून एकूण 1000 मुलींच्या लग्नासाठी मदत होणार आहे. शिवसंग्राम पक्षाच्या (Shiv Sangram Party) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा दीपाली सय्यद याधीही अनेक सामाजिक कार्यांना हातभार लावला आहे. (हेही वाचा: अखेर अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे उपोषण मागे; पालकमंत्र्यांनी केली मध्यस्थी, पुन्हा नवे आश्वासन)

नुकतेच अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यातील साकळाई उपसा जलसिंचन योजनेला (Sakhalai Water Irrigation Scheme) मंजुरी मिळावी म्हणून सय्यद ग्रामस्थांसह उपोषणाला बसल्या होत्या. दरम्यान सय्यद यांच्यासोबतच चित्रपटसृष्टीमधील इतर अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये  रितेश देशमुख, अक्षय कुमार तसेच संतोष जुवेकर, सुबोध भावे. नाना पाटेकर, अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे.