सतार झाली पोरकी, अन्नपूर्णा देवी यांचे निधन; शास्त्रीय संगीतात उमटला करुण स्वर
अन्नपूर्णा देवी (संग्रहित-प्रतिमा)

भारतीय शास्त्रीय संगीतातील एका महान पर्वाचा आज अंत झाला. ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आज (शनिवार, १३ ऑक्टोबर) पहाटे 3 वाजून 51 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. भारतीय शास्त्रीय संगितात त्यांनी मोठे योगदान दिले. सतारीवर त्यांचे अभूतपूर्व प्रभुत्व होते. आपल्या सतार वादनाने त्यांनी भारतच नव्हे तर, जगभरातील श्रोते आणि रसिक, संगितप्रेमींनी मंत्रमुग्ध केले. मात्र, गेली काही वर्षे त्या एकांतवासात गेल्या होत्या. त्यामुळे रसिकांना त्यांच्या सदारवादनाचा आनंद लूटता आला नाही. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गैरविण्यात आले होते.

सन १९२७मध्ये मध्यप्रदेशातील मैहर येथे अन्नपूर्णा देवींचा जन्म झाला. उत्साद बाबा अल्लाउद्दीन खान यांच्या कन्या असलेल्या अन्नपूर्णादेवी एकूण चार भावंडांपैकी एक. सर्व भावंडामध्ये त्या सर्वात धाकट्या होत्या. उत्सादांच्याच पोटी जन्म घेतल्यामुळे संगीताचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. सैना-मैहर घराण्यातील सतार वादक म्हणून त्यांनी जगभरात नाव कमावले. आपल्या एकूण संगीत कारकिर्दीत सरोद वादक आशिष खान, सरोद वादक अमित भट्टाचार्य, सरोद वादक बहाद्दुर खान, सरोद वादक बसंत काब्रा आणि बासरी वादक हरिप्रसाद चौरासिया यांच्यासारखे शिष्य लाभले. त्यांच्या शिष्यांनीही जगभरात प्रचंड नाव कमावले.

पंडीत रविशंकर यांच्यासोबत अन्नपूर्णा देवी विवाहबद्द झाल्या. पुढे त्यांनी शुभेंद्र नावाच्या मुलाला जन्म दिला. १९९२मध्ये शुभेंद्र यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अन्नपूर्णादेवींनी रविशंकर यांच्यापासून घटस्फोट घेऊन, ऋषीकुमार पंड्या यांच्यासोबत लग्न केले. दरम्यान, 2013 मध्ये पंड्या यांचा मृत्यू झाला.