ज्येष्ठ बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांचे कोलकत्यामध्ये निधन
मृणाल सेन (Photo Credit: File Image)

ख्यातनाम बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन (Mrinal Sen) यांचे निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते, मे 14, 1923 रोजी त्यांचा जन्म झाला होता. कोलकत्यामधील राहत्या घरात हृदयविकाराचा झटक्याने त्यांचे निधन झाले. मृणाल सेन यांनी अनेक लोकप्रिय बंगाली आणि हिंदी भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मृणाल सेन यांना 1981 में पद्म भूषण आणि 2005 मध्ये दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सेन यांनी एफटीआयच्या अध्यक्षपदाचा पदभारदेखील सांभाळला होता. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, विशेषतः बंगाली चित्रपटसृष्टीमधील लोकांसाठी हा फार मोठा धक्का आहे.

1955 साली मृणाल सेन यांनी 'रात भोर' (Raat Bhore) या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर 1960 च्या 'बाइशे श्रावण' (Baishey Shravana) या चित्रपटाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळवून दिली. 1969 साली त्यांनी 'भुवन शोम' (Bhuvan Shome) या चित्रपटाद्वारे हिंदीमध्येही पदार्पण केले. आत्तापर्यंत त्यांना विविध श्रेणींमध्ये तब्बल 18 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award) प्राप्त झाले आहेत. 4 फिल्मफेअर पुरस्कार, तर विविध 12 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. (हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती चिंताजनक)

मृणाल सेन हे भारतामधील सर्वात लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक होते. देशात पॅरलल सिनेमाची लाट आणण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. परदेशातही आपल्या चित्रपटांद्वारे त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी  विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे जज म्हणूनही भूमिका पार पाडली आहे. मृणाल सेन यांचा मुलगा कुणाल हा अमेरिकेत राहतो, तो भारतात येईपर्यंत त्यांचे पार्थिव तसेच ठेवण्यात येणार आहे.