गाता गळा कायम राहणार; गायनातील निवृत्तीबद्दल लता मंगेशकरांनी केले हे वक्त्यव्य
लता मंगेशकर (Photo Credit-Facebook)

लता मंगेशकर भारतातील एकमेव अशा गायिका असतील ज्या या वयातही गात आहेत. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात 1942 मध्ये, म्हणजे अवघ्या तेराव्या वर्षी झाली. आज तब्बल 60 दशकांचा कालावधी लोटला तरी त्यांच्या आवाजाची मोहिनी काही कमी झाली नाही. लता मंगेशकर या वयातही सोशल मिडियावर सक्रीय आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा, काही स्पेशल दिवसांच्या शुभेच्छा, जीवनातील महत्वाच्या घडामोडी अशा अनेक गोष्टी दीदी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच लता मंगेशकर यांनी त्यांच्याच एका अल्बममधील मराठी गाणे ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गाणे सोशल मिडियावर पोस्ट केले होते. मात्र त्यांना कल्पनाही नसेल की या पोस्टमुळे मिडियामध्ये गदारोळ माजेल.

तर या गाण्याच्या अर्थामुळे अनेकांना असे वाटले की आता लता दीदी संगीताच्या कारकिर्दीमधून निवृत्ती घेत आहेत. ‘लता मंगेशकर आता इथून पुढे गाणार नाहीत, त्यांनी निवृती घेतली’ अशा अफवाही पसरल्या. या संदर्भाच्या अनेक बातम्या अनेक माध्यमांनी प्रसिध्दही केल्या. त्यानंतर दीदींना अनेकांनी फोन करून याची खातरजमा करून घेतली, कित्येकांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या याबद्दल विचारणा झाली. मात्र आता स्वतः लता मंगेशकरांनी या वृत्तावर पडदा टाकला आहे.

यासंदर्भात दीदी म्हणतात, ‘मला स्वतःलाच माहिती नाही ही बातमी कुठून आली. माझ्या या मराठी गीताला निवृत्तीचे संकेत समजले जात आहे. मात्र पाच वर्षांपूर्वी मी हे गीत गायले होते. मला कल्पनाही नव्हती की काही करामती लोक याला माझ्या निवृत्तीशी जोडतील.’ लता मंगेशकरांनी सांगितले आहे की आता निवृत्ती घेण्याची त्यांची कोणतीही इच्छा नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्या गात राहतील.

दरम्यान ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गीत सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले असून, बाळकृष्ण बोरकरांनी ही कविता लिहिली आहे.