World Saree Day : साड्यांना ग्लॅमरस लूक मिळवून देणाऱ्या बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्री
श्रीदेवी (Photo credit : Sitapati)

World Saree Day : बॉलिवूडमध्ये रोज नवीन फॅशन ट्रेंड येत असतात. लोक ते फॉलो करतात आणि काही दिवसांनतर तो ट्रेंड विसरूनही जातात. सुंदर दिसण्याच्या अट्टाहासापायी अनेक विचित्र कल्पनांचा फॅशन म्हणून वापर केला जातो. मात्र लोकांना कोणत्या वेळी कोणती फॅशन आवडेल हे सांगणे कठीण, म्हणूनच  अनेक समारंभातील अभिनेत्रींच्या स्टाईलमुळे काही अभिनेत्रींचे कौतुक होते तर काहींना ‘ट्रोल’चा सामना करावा लागतो. मात्र अशी एकमेव स्टाईल आहे जी व्यवस्थित कॅरी केल्यावर प्रत्येक अभिनेत्री सुंदर दिसते. या स्टाईलची कल्पना उचलली गेली आहे ती भारतीय संस्कृतीमधून. ना कधी ती आउटडेटेड होती ना कधी होणार. ती म्हणजे भारतीय पेहरावातील अविभाज्य घटक साडी !

आपण अनेक अभिनेत्रींना वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनर साडीमध्ये पाहतो. विद्या बालन तर नेहमीच साडीला पसंती देते. मध्यंतरीच्या काळात परदेशातील ट्रेंड्स जेव्हा भारतात येऊ घातले तेव्हा साडी हा प्रकार काहीसा मागे पडला. मात्र बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी तो जिवंत ठेवला आणि आज बॉलिवूडमध्ये साडी हे स्टाईल स्टेटस् मानले जाते, ज्याचे पूर्ण श्रेय जाते बॉलिवूडमधील काही गाण्यांना. बॉलिवूडमधील काही गाण्यांमध्ये साडीचा जो कमालीचा उपयोग केला गेला आहे, तो पाहून प्रत्त्येक भारतीय स्त्रीला अशी साडी आपल्याकडे असावी असे वाटू लागले. चला तर पाहूया अशी कोणती गाणी आहेत ज्यांच्यामुळे साडीला मिळाला ग्लॅमरस लूक.

धक धक करने लगा – माधुरी दीक्षित

या गाण्यामधील माधुरीची नारंगी रंगाची साडी आजही सर्वांना आठवत असेल. माधुरीच्या या साडीमुळेच तिला एक हॉट आणि सेक्सी लूक मिळाला होता. बॅकलेस ब्लाऊजसोबत काही वेगळ्या ढंगात नेसलेल्या या साडीशी निगडीत अनेक स्टेप्स या गाण्यात होत्या. या गाण्यानंतरच माधुरीचे नाव 'धक धक गर्ल' असे पडले.

काटे नहीं कटते - श्रीदेवी

हे गाणे जितके त्याच्या संगीतामुळे गाजले तितकेच लोकप्रिय झाले ते गाण्यातील श्रीदेवीच्या साडीमुळे. त्याकाळी ही निळ्या रंगाची साडी पाहून अनेक तरुणींनी अशाच प्रकारची साडी खरेदी केली होती. फॅशन वर्ल्डमध्ये शिफॉनच्या साडीचा ट्रेंड याच साडीमुळे आला असे म्हणायला काही हरकत नाही.

तेरे मेरे ओठों पे – श्रीदेवी

श्रीदेवीने अनेक चित्रपटांमध्ये साड्यांना प्राधान्य दिलेले दिसून येते. साडीमध्ये जितकी ती सुंदर दिसली  तितकी क्वचितच वेस्टर्न आउटफ़ीटमध्ये दिसून आली असेल. आता हेच गाणे पहा, आणि स्वतः ठरवा. या संपूर्ण गाण्यामध्ये श्रीदेवीने 6 वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर साड्यांचा वापर केला आहे.

तेरी ओर - कटरीना कैफ

कटरीनाला आपण नेहमीच वेस्टर्न कपड्यात पहिले आहे. मात्र साडीतही ती किती सुंदर दिसू शकते याचे हे गाणे उत्तम उदाहरण आहे. पिंक बॉर्डरच्या या ब्लॅक साडीची चर्चा त्यावेळी चांगलीच रंगली होती.

गोरी गोरी – सुश्मिता सेन

मै हुं ना या चित्रपटासाठी सुश्मिताला खास साडी लूक देण्यात आला होता. या चित्रपटामध्ये साडी हा प्रकार जितका सेक्सी दिसला तितका कोणत्याच चित्रपटात दिसला नसेल. साडीमध्ये जितक्या अफलातून पद्धतीने सुश्मिताने नृत्य केले आहे त्याला तोड नाही. या चित्रपटानंतर थोड्या हटके पद्धतीने पदर कॅरी करायची फॅशनही इंडस्ट्रीमध्ये आली होती.

तितली - दीपिका पादुकोण

या गाण्यामध्ये दीपिका दाक्षिणात्य साडीमध्ये दिसून आली होती. साडीमुळे स्त्रीचे सौंदर्य किती खुलून दिसते हे गाण्यामुळे सिद्ध झाले. आजही या गाण्यामधील दीपिकाच्या लूकचे अनेकजण दिवाने आहेत.

देसी गर्ल – प्रियंका चोप्रा

अभिनेत्रींना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून देण्यास गाणी आणि त्यामध्ये वापरलेला आउटफीट किती महत्वाची भूमिका बजावतो हे या गाण्यातून समजते. याच गाण्यातील या साडीमुळे आज प्रियंकाला देसी गर्ल म्हणून ओळखले जाते. प्रियंकाच्या या लूकनंतर इंडस्ट्रीमध्ये मेटालिक साड्यांचा ट्रेन्ड आला होता.

दीदी तेरा देवर दीवाना – माधुरी दीक्षित

एक काळ होता जेव्हा लग्नात अथवा समारंभात प्रत्येक मुलगी या निळ्या साडीला प्राधान्य द्यायची. याचे संपूर्ण श्रेय जाते ते या गाण्यातील माधुरीच्या साडीला. 'हम आपके है कौन' या चित्रपटामध्ये माधुरी निळ्या साडीमध्ये ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली होती. सुंदर बॉर्डर, कोपरापर्यंत स्लीव्हज ब्लाऊज आणि बांगड्यांसोबतचा माधुरीचा हा लूक आजही अनेकांना घायाळ करतो.

कैसी पहेली – रेखा

आपल्या अदांनी आजही लोकांच्या दिलावर राज्य करणारी रेखा, जेव्हा परिणीता चित्रपटामधील या गाण्याद्वारे लोकांसमोर आली, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या गाण्यामध्ये अगदी साध्या साडीतही या वयात रेखा इतकी सेक्सी दिसू शकते यावर विश्वासच बसत नाही. यासाठी कारणीभूत आहे तो रेखाचा हा साडी लूक

टीप टीप बरसा – रविना टंडन

बॉलिवूडमधील पावसाची गाणी आणि साडी यांचे कनेक्शन फार आधीपासून दिसून येते. या गाण्यामध्ये अक्षय आणि रविना यांची इंटेन्स केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. हे गाणे जितके ऐकायला सुंदर वाटते तितकेच पाहायलादेखील सुंदर वाटते ते रविनाच्या यलो साडीमुळे. पावसात भिजलेल्या या साडीमधील राविनाचा नृत्याविष्कार पाहून आजही अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.