The Accidental Prime Minister : अपेक्षित बदल केले नाहीत, तर चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही; सत्यजीत तांबे यांचा इशारा
The Accidental Prime Minister (Photo Credits: Twitter)

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr Manmohan Singh) यांच्या आयुष्याचा वेध घेणारे, संजय बारू लिखित 'दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' (The Accidental Prime Minister) 2014 साली प्रकाशित झाले. त्यानंतर पहिल्यांदाच मनमोहन सिंग यांच्या एका वेगळ्या व्यक्तीमत्वाची ओळख जनतेला झाली. आता याच पुस्तकावर आधारीत सिनेमा येऊ घातला आहे. या चित्रपटात अनुपम खेर (Anupam Kher) यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरनंतर आता देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही सीन्सवर कॉंग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे.

2019 मध्ये निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास, कॉंग्रेसचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात मनमोहन सिंग यांच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. म्हणून प्रदर्शनापूर्वी तो काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दाखवण्यात यावा, अन्यथा काँग्रेस हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा राज्यातील युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना दिला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मनमोहन सिंग हे अंतर्गत वादामुळे त्रासलेले असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका यांनी डॉ. सिंग यांच्यावर टीका केली असल्याचे दाखवले आहे. अशा अनेक गोष्टींना कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. जोपर्यंत या चित्रपटात अपेक्षित बदल करण्यात येणार नाही, तोपर्यंत  हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार नाही. अशी भूमिका कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. (हेही वाचा : या वाद-विवादांनी रंगले बॉलीवूडचे 2018 हे वर्ष)

या चित्रपटात सुझेन बेरनर्टने सोनिया गांधी यांची भूमिका साकारली आहे. तर अहाना कुम्राने प्रियांका गांधींची भूमिका साकारली आहे. राहुल गांधी यांच्या भूमिकेत अर्जुन माथून दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय गुट्टे यांनी केले असून, येत्या 11 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.