Will Smith Banned: Chris Rock ला कानशिलात लगावणे विल स्मिथला पडले महागात; अकादमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास 10 वर्षांसाठी बंदी
Will Smith (PC - ANI)

Will Smith Banned: हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ (Will Smith) चे जगभरात प्रचंड चाहते आहेत. सध्या विल स्मिथ त्याच्या अभिनयामुळे नाही तर ऑस्करशी संबंधित वादामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान, त्याच्याशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. जी, ऐकून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.

ऑस्कर सोहळ्यादरम्यान हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याने कॉमेडियन ख्रिस रॉक (Chris Rock) ला कानशिलात लगावली होती. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (ऑस्कर) ने शुक्रवारी विल स्मिथवर बंदी घातली. या निर्णयानंतर विल पुढील 10 वर्षे कोणत्याही ऑस्कर कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेत्री Sonam Kapoor च्या घरावर दरोडा; दागिन्यांसह 1.41 कोटींची चोरी)

यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ख्रिस रॉकला स्टेजवर कानशिलात मारल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे अकादमीचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन यांनी सांगितले. या निर्णयाला प्रशासक मंडळानेही सहमती दर्शवली आहे. डेव्हिडने सांगितले की, या घटनेनंतर विलला हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये बसण्याची परवानगी देण्यात आली आणि त्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे अकादमीकडून टीका झाली.

दरम्यान, 27 मार्च रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. दरम्यान, स्टेजवर कॉमेडियन ख्रिस रॉकने अभिनेता विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेटच्या आजारपणाबद्दल विनोद केला. या विनोदाने विल नाराज झाला. तो जागेवरून उठला आणि स्टेजवर गेला. त्याने ख्रिसला जोरदार थप्पड मारली. त्याचवेळी विलने ख्रिसला इशारा देत सांगितले की, माझ्या पत्नीचे नाव पुन्हा घेऊ नकोस.

वास्तविक, ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी अभिनेत्री-गायिका जेडा पिंकेटच्या टक्कल पडण्याबद्दल विनोद केला होता. आजारपणामुळे पिंकेटने तिचे केस कापले होते. वास्तविक, ती अलोपेशिया या आजाराशी झुंज देत आहे. त्यामुळे केस गळतात.

कॉमेडियनला कानशिलात मारल्यानंतर विलने 29 मार्च रोजी अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चरचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर दिलेल्या निवेदनात विलने म्हटलं होत की, मी ज्यांना दुखावले आहे त्या सर्वांची मी माफी मागतो. अकादमीच्या विश्वासाचा मी विश्वासघात केला आहे. बोर्ड जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल.