Bruce Lee Death Reason: काय सांगता? जास्त पाणी प्यायल्याने झाला असावा ब्रुस लीचा मृत्यू; नवीन अभ्यासात धक्कादायक दावा
Bruce Lee (Photo Credit: File Image)

मार्शल आर्ट्सचा राजा म्हणून ओळखला जाणारा चित्रपट अभिनेता ब्रूस ली (Bruce Lee) याचे वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी निधन झाले होते. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप गूढच आहे. मात्र, शास्त्रज्ञांनी एका नवीन अभ्यासात दावा केला आहे की ब्रूस लीचा मृत्यू बहुधा जास्त पाणी पिण्यामुळे झाला असावा. ब्रूस ली याचे 20 जुलै 1973 रोजी हाँगकाँगमध्ये अगदी लहान वयात निधन झाले होते.

सेरेब्रल एडेमा म्हणजेच मेंदूला सूज आल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत्यूच्यावेळी तो  आजारी नव्हता किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. अचानक त्याची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. ब्रूस लीच्या मृत्यूच्या वेळी डॉक्टरांनी सांगितले की त्याने वेदनाशामक औषध घेतले होते, त्यामुळे त्याच्या मेंदूला सूज आली होती. हेच त्याच्या मृत्यूचे कारण ठरले. मात्र, नवीन अभ्यासानुसार मूत्रपिंड निकामी होणे हे मृत्यूचे कारण आहे.

क्लिनिकल किडनी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी सांगितले की, मेंदूला सूज येण्यासाठी हायपोनेट्रेमिया जबाबदार आहे. संशोधकांचा असा कयास आहे की ब्रूस लीचा मृत्यू झाला कारण त्याची किडनी खराब झाली होती आणि तो शरीरातून जास्तीचे पाणी बाहेर टाकू शकत नव्हता. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होते आणि रक्तातील त्याचे प्रमाण असंतुलित होते. यामुळे शरीरात हायपोनेट्रेमियाची स्थिती निर्माण होते.

यामध्ये शरीरातील पेशी असंतुलनामुळे फुगतात. याचा विशेषतः मेंदूवर परिणाम होतो. संशोधकांचा असा विश्वास आहे की ब्रूस लीमध्ये हायपोनेट्रेमियासाठी अनेक घटक उपस्थित होते. त्याने भरपूर पाणी प्यायले आणि गांजा वापरला. संशोधकांचे म्हणणे आहे की, ब्रूस लीने त्याच्या मृत्यूच्या दिवशी तैवानची अभिनेत्री बेट्टी टिंगच्या घरी भेट देण्यापूर्वी गांजा ओढला होता आणि आगामी चित्रपटाच्या काही दृश्यांमध्ये सक्रियपणे अभिनय केला होता. (हेही वाचा: अभिनेत्री Denise Richards आणि पती Aaron Phypers यांच्यावर प्राणघातक हल्ला, सर्वांसमोर अंधाधुंद गोळीबार)

त्याच्यासोबत चित्रपटांचे निर्माते रेमंड चाऊ होते. सायंकाळी 7.30 च्या सुमारास पाणी प्यायल्यानंतर ब्रूस लीला डोकेदुखी आणि चक्कर येऊ लागली. त्यानंतर टिंगने त्याला 'इक्वेजेसिक' गोळी दिली आणि आराम करण्यासाठी बेडरूममध्ये नेले. तेथे रात्री 9.30 वाजता तो बेशुद्धावस्थेत आढळला.

यानंतर ब्रूस लीला जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या शवविच्छेदनात बाह्य जखमा आणि जीभ चावल्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. संशोधकांनी सांगितले की सेरेब्रल एडेमामुळे त्याच्या मेंदूचे वजन सामान्य 1400 ग्रॅमच्या तुलनेत 1575 ग्रॅम इतके वाढले होते. लीच्या वैद्यकीय इतिहासातील इतर घटक, जे संशोधकांनी त्याच्या मृत्यूला कारणीभूत मानले, त्यामध्ये- गांजाचा वापर, अल्कोहोल, खराब आहाराचे सेवन, प्रिस्क्रिप्शनशिवाय ड्रग्स घेणे, लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ, ओपिओइड्स, किडनी बिघडवणारे कार्य, जास्त व्यायाम आणि त्याच्या मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वी सेरेब्रल एडेमा यांचा समावेश होता.

ब्रूस लीच्या मृत्यूबद्दल अनेक कथा आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की त्याची हत्या चीनमधील गुंडांनी केली आहे. काहींचा असा विश्वास होता की त्याच्या मृत्यूमागे ब्रूस लीची माजी मैत्रीण होती. ब्रूस लीच्या जुन्या मैत्रिणीने त्याला विष प्राशन केल्याचे सांगण्यात आले. काही लोक उष्माघात हे मृत्यूचे कारण मानतात. ब्रूस लीबद्दल असे म्हटले जाते की, तो आपल्या आहारात द्रवपदार्थ जास्त घेत असे. ब्रूस ली याच्यावर लिहिलेल्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. ब्रूसची पत्नी लिंडा हिने देखील एकदा सांगितले की तो गाजर आणि सफरचंदाचा रस भरपूर प्यायचा.