जगाला भूरळ पाडलेल्या हॉलिवूड सिनेमा 'एवेंजर्स एंडगेम' (Avengers Endgame) ने भारतीय बॉक्स ऑफिसवर देखील जबरदस्त कमाई केली आहे. जो आणि एंथनी रूसो दिग्दर्शित या सिनेमाने प्रदर्शनानंतर आठव्या दिवशी भारतात तब्बल 12 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने संपू्र्ण जगभरात सुमारे 272 कोटी 40 लाखांची कमाई केली आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत अव्वल ठरला आहे. या सिनेमाने क्रिश 3 आणि उरी सर्जिकल स्ट्राईक या सिनेमांना मागे टाकले आहे. सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता या वीकेंडला सिनेमा 300 कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. (एवेंजर्स एंडगेम सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अवघ्या 5 दिवसात तब्बल 1 अब्ज डॉलरची कमाई)
भारतात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू मिळून 2845 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतात हा सिनेमा 500 कोटींची कमाई करेल, असे शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सिनेमाचा पहिला भाग एवेंजर्स इनफिनिटी वॉरला 31 कोटी 30 लाखांची ओपनिंग मिळाली होती. त्यावेळेस हा सिनेमा 2000 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर रिलिज करण्यात आला होता. या सिनेमाने पहिल्या वीकेंडला 94 कोटी 30 लाख रुपयांची कमाई केली होती आणि एकूण 227 कोटी 43 लाखांचे कलेक्शन केले होते.
थॅनोस विरुद्ध मार्वल सुपरहिरो यांचे हे शेवटचे युद्ध असल्याने एवेंजर्स एंडगेम सिनेमासाठी पूर्ण जगभरातील चाहते उत्सुक आहेत. या सिनेमामध्ये रॉबर्ट डाउनी जूनियर, क्रिस इवांस, मार्क रफेलो, क्रिस हेम्सवर्थ, स्कारलेट जोहानसन, जेरेमी रेनर, पॉल रड आणि ब्री लार्सन यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.