प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरस (Coronavirus) या साथीच्या आजाराशी झगडत आहे. अशात अनेक देशांनी सुरक्षेचा उपाय म्हणून लॉक डाऊनचा (Lockdown) मार्ग अवलंबला आहे. मात्र यामुळे अनेक जागतिक कार्यक्रम रद्द झाले आहे. अशात मुंबई चित्रपट महोत्सवासह 20 चित्रपट महोत्सव 'We Are One’ या एकाच व्यासपीठावर ऑनलाईन फिल्म फेस्ट अंतर्गत एकत्र आले आहेत. 'वी आर वन' हा जागतिक चित्रपट महोत्सव असेल ज्या अंतर्गत जगभरातील नवीन आणि क्लासिक चित्रपट यूट्यूबच्या (Youtube) माध्यमातून पाहण्याची संधी मिळणार आहे. आज, 29 एप्रिल पासून या महोत्सवाला सुरुवात झाली असून, तो 7 मे पर्यंत चालेल.

लॉक डाऊनमुळे सध्या अनेक खेळांच्या स्पर्धा, इव्हेंट्स रद्द झाले आहेत. अशात याचा फटका जागतिक स्तरावरील चित्रपट महोत्सवांनाही झाला. मात्र यावर एक तोडगा काढून असे 20 चित्रपट मोहत्सव एकत्र आले आहेत, जे यूट्यूबच्या माध्यमातून आपले चित्रपट दाखवतील. हा ऑनलाईन फिल्म फेस्टिव्हल, न्यूयॉर्कच्या ट्रीबेका एंटरप्रायजेद्वारे आयोजित केला गेला आहे.

यामध्ये बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, सनडान्स फिल्म फेस्टिव्हल, सिडनी फिल्म फेस्टिव्हल, टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, टोरोंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ट्रीबेका फिल्म फेस्टिव्हल, व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल, न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल आणि कान्स फिल्म अशा महत्वाच्या मोहत्सावाच्या प्रोग्रामिंगसह,  जेरुसलेम फिल्म फेस्टिव्हल, मारकेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, अन्नेसी आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन फिल्म फेस्टिव्हल, बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल, गुआडालजारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि कार्लोवी व्हेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सामील झाले आहेत. (हेही वाचा: कोरोना व्हायरस लढ्यासाठी रजनीकांतने अधिक मदत केली का विजयने? चाहत्यांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू)

कोरोना व्हायरससाठी मदत निधी जमा करणे हा या चित्रपट महोत्सवाचा उद्देश आहे. उत्सवाच्या काळात जमा झालेला निधी कोरोना व्हायरस  मदत निधीला दिला जाईल. तर असे हे सर्व चित्रपट तुम्ही पुढचे दहा दिवस मोफत पाहू शकणार आहात.