मराठी चित्रपट विषय, मांडणी, हाताळणी यांबाबत नेहमीच प्रयोगशील ठरला आहेव. काही अपवाद वगळता नेहमीच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवनवीन प्रयोग होत असलेले दिसतात. त्यामुळे बॉलिवूडला देखील याची भुरळ पडली असावी यात नवल ते काय? म्हणूनच हिंदी सोबत इतर अनेक भाषांमध्येही मराठी चित्रपटाचे रिमेक बनलेले दिसतात. चला तर पाहूया असे कोणते अकरा मराठी चित्रपट आहेत ज्यांचे हिंदीमध्ये रिमेक बनलेले आहेत.

धडक (२०१८)

कित्येक वर्षानंतर मराठी चित्रपट सृष्टीने पाहिलेले अभूतपूर्व यश म्हणजे सैराट ! चित्रपटाची कथा, गाणी, अभिनय या सर्वांनीच लोकांना अक्षरशः याड लावले. म्हणूनच १०० करोड रुपयांचा टप्पा पार करणारा सैराट पहिला मराठी चित्रपट ठरला. आणि पाठोपाट सैराटचा कन्नड रिमेक ‘मनसु मल्लिगे’ आणि हिंदी रिमेक ‘धडक’ प्रदर्शित झाले. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर आणि अभिनेता इशान अशी स्टारकास्ट असलेला धडक हिंदी प्रेक्षकांना देखील चांगलाच भावला.

पोस्टर बॉईज (२०१७)

श्रेयस तळपदेचा दिग्दर्शकीय पदार्पण असलेला पोस्टर बॉईज हा श्रेयस तळपदे अभिनित मराठी चित्रपट पोस्टर बॉईजचा रिमेक आहे. सनी देओल, बॉबी देओल यांची मुख्य भूमिका असलेल्या या हिंदी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळजवळ ११ करोड रुपयांचा गल्ला जमवला होता.

दम लगा के हईशा (२०१५)

आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला दम लगा के हईशा आणि मराठी चित्रपट आगडबम यांच्यामध्ये कमालीचे साम्य दिसून येते. शरद कटारिया यांनी दिग्दर्शित केलेल्या या हिंदी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३० करोड रुपयांचा व्यवसाय केला होता. तसेच या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट गायिका आणि सर्वोत्कृष्ट गीतकार यांचे राष्ट्रीय पुरस्कारदेखील पटकावले आहेत.

मुंबई दिल्ली मुबई (२०१४)

सतीश राजवाडे दिग्दर्शित रोमँटीक कॉमेडी असलेला हा चित्रपट राजवाडे यांचाच सुपरहिट ठरलेला मराठी चित्रपट ‘मुंबई पुणे मुंबई’ याचा रिमेक आहे. शिव आणि पिया यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला पेक्षकांनी तितकीसी पसंती दिली नसली, तरी मराठीमधील स्वप्नील मुक्ताची जोडी चांगलीच भाव खाऊन गेली. मराठीमध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला असून आता राजवाडे तिसरा भाग घेऊन येत आहेत.

पेईंग गेस्ट (२००९)

श्रेयस, जावेद, आशिष, वत्सल यांचा हा कॉमेडी चित्रपट, सचिन दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘अशी ही बनवा बनवी’वर आधारीत आहे. मात्र या चित्रपटाचे मूळ १९६६चा ‘बिवी और मकान’ हा चित्रपट असल्याचे मानले जाते.

गोलमाल रिटर्न्स (२००८)

रोहित शेट्टीच्या गोलमाल त्रयीमधील हा चित्रपट १९८९चा मराठी चित्रपट ‘फेका फेकी’वर बेतलेला आहे. मात्र मराठीपेक्षा हिंदी गोलमाल रिटर्न्सला पेक्षकांनी चांगलीच पसंती दिली.

हे बेबी (२००७)

साजिद खानचा हा कॉमेडी चित्रपट मराठीमध्ये १९८९साली प्रदर्शित झालेल्या ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’वर आधारीत आहे. मात्र याच धर्तीवर १९८७ साली अमेरिकेमध्ये ‘थ्री मॅन अँड अ बेबी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यामुळे हिंदी आणि मराठी या दोन्ही चित्रपटांचे मूळ हा इंग्लिश चित्रपट असावा असे मानण्यास काही हरकत नाही.

भागमभाग (२००६)

प्रियदर्शनचा रहस्यमय कॉमेडी असलेला हा चित्रपट बऱ्याच अंशी मराठी चित्रपट बिनधास्तवर आधारीत आहे.

टारझन – द वंडर कार (२००४)

अबब्बास मस्तानचा हा फँटसी थ्रिलर, १९८३चा इंग्लिश चित्रपट क्रिस्टीनवर आधारीत आहे. याच धर्तीवर मराठीमध्येही ‘एक गाडी बाकी अनाडी’ हा चित्रपट बनला होता.

क्योंकी मै झूट नही बोलता (२००१)

डेविड धवनचा हा चित्रपट मराठीमधील ‘धांगड धिंगा’वर आधारीत आहे. हिंदीमधील गोविंदा आणि सुश्मिताच्या जोडीला पेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती.

मासूम (१९९६)

महेश कोठारे दिग्दर्शित माझा छकुला हा मराठीमधील प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. याच चित्रपटावर आधारीत महेश कोठारे यांनी हिंदीमध्ये ‘मासूम’ बनवला. मात्र मराठीमध्ये बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटाकडे हिंदी प्रेक्षकांनी पाठ फिरवली.