ईशा अंबानी - आनंद (Photo Credit: Instagram)

2018 मध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लग्नाचे मुहूर्त होते. म्हणूनच लग्नाळू लोकांनी जितके काही मुहूर्त मिळतील त्या त्या मुहूर्तावर जमेल तसे या वर्षी डोक्यावर अक्षता पाडून घेतल्या. यात बॉलीवूडकर कसे मागे राहतील? सोनम कपूर, दीपिका पदुकोन आणि प्रियंका चोप्रा या तीन आघाडीच्या तारकाही यावर्षी विवाहबंधनात अडकल्या. 12 डिसेंबर हा 2018 मधील लग्नाचा खास मुहूर्त होता, म्हणूनच उरले सुरले मंडळीही काल विवाहबंधनात अडकले. यातील सर्वात चर्चित लग्न ठरले ते ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे. चला पाहूया याचसोबत अजून कोणत्या मंडळींनी लग्नगाठ बांधली.

इशा अंबानी - आनंद पिरामल

मोठ्या धुमधडाक्यात काल अंबानी कन्येचा विवाहसोहळा पार पडला. 700 करोड रुपयांचे लग्न म्हणून या लग्नाकडे पहिले गेले. मुंबईतील ‘अँटिलीया’ या अंबानींच्या आलिशान घरात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलिवूड, राजकारणी, क्रीडा आणि उद्योग विश्वातले अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते.

कपिल शर्मा- गिन्नी छत्रत

कॉमेडी किंग कपिल शर्मा याने काल आपली प्रेयसी गिन्नी छत्रतसोबत लग्नगाठ बांधली. हा विवाह जालंधरमध्ये मोजक्याच मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. या लग्नसाठी कृष्णा अभिषेक, भारती सिंग, सिमोना चक्रवर्ती असे काही कलाकार उपस्थित होते.

रघु राम – नताली दी ल्युचो

‘रोडीज’ या रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता रघु राम काल दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला. कॅनेडियन प्रेयसी नताली दी ल्युचो हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली. दाक्षिणात्य पद्धतीने रघु राम आणि नतालीचा विवाहसोहळा पार पडला. 2018 च्या सुरुवातीला रघुने पत्नी सुगंधा गर्ग हिच्याशी घटस्फोट घेतला होता, त्यानंतर रघु आणि नताली हे दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

पारुल चौहान - चिराग

स्टार प्लस वाहिनीवरील ‘बिदाई’फेम अभिनेत्री पारूल चौहान हिचा विवाहसोहळाही 12 डिसेंबर रोजी संपन्न झाला. चिराग ठक्करसोबत ती विवाहबंधनात अडकली. मुंबईतल्या इस्कॉन मंदिरात अगदी सध्या पद्धतीने पारुलने लग्न केले. दोन वर्षांपासून पारुल आणि चिराग रिलेशनशिपमध्ये होते.

अदिती गुप्ता - कबीर चोप्रा

स्टार प्लसच्याच ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून छोट्या पडद्या अवतरलेली अभिनेत्री अदिती गुप्ताही कबीर चोप्रासोबत विवाहबंधनात अडकली. या लग्नासाठी दृष्टी धामी, कृतिका कर्मा, अनिता हसनंदानी अशा अनेक छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्री उपस्थित होत्या.

श्रेया कपूर- अमित देसाई

12 डिसेंबरचा मुहूर्त साधून गायिका अलका याग्निक यांनीदेखील आपल्या मुलीचा विवाहसोहळा पार पाडला. अलका याग्निक यांची मुलगी श्रेशा कपूर ही अमित देसाईसोबत विवाहबंधनात अडकली.