Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga Trailer : एक लोकप्रिय अभिनेता आणि त्याची तितकीच लोकप्रिय अभिनेत्री मुलगी एकत्र चित्रपटात झळकल्याची फार कमी उदाहरणे आपण पाहिली आहेत. आता अशीच एक बाप-मुलीची जोडी पडद्यावर येणार आहे, ती म्हणजे अनिल कपूर आणि सोनम कपूर (Anil Kapoor and Sonam Kapoor). अनिल कपूरचेच गाणे ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ (Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga) या नावाच्या चित्रपटात अनिल कपूर आणि सोनम कपूर वडील-मुलीची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सोनम कपूरची एक अनोखी प्रेमकहाणी या चित्रपटामधून पाहायला मिळणार आहे.
लग्नाळू सोनम कपूरसाठी वडील अनिल कपूर आणि कुटुंब विविध स्थळे शोधत असतात. त्यात ती एका मुलाच्या प्रेमात पडली आहे असे तिच्या कुटुंबियांना वाटते. मात्र सत्य काही वेगळेच असते. ट्रेलरमधील शेवटच्या शॉटवरून सोनम कपूर लेस्बियन असल्याचे कळते. मात्र तिचे हे सत्य तिचे कुटुंबीय समजून घेतील का? त्यांना हे समजल्यावर त्यांची त्यावर काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गे आणि लेस्बियन भूमिका आपण अनेक चित्रपटांमध्ये पहिल्या आहेत. मात्र एक लेस्बियन नाते मध्यवर्ती ठेऊन व्यवसायिक चित्रपटाची निर्मिती झाली नव्हती. याआधी फायर (Fire) नावाच्या चित्रपटात शबाना आझमी आणि नंदिता दास यांनी अशी भूमिका साकारली होती. मात्र करियरच्या एका महत्वाच्या टप्प्यावर सोनम कपूरने अशी भूमिका स्वीकारून धाडसाचे काम केले आहे.
अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव (Rajukummar Rao) आणि जुही चावला यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. विधू विनोद चोप्रा यांची बहिण शैली चोप्रा हिने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा सिनेमा येत्या 1 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.