बॉलिवूड गाणी ((Photo Credits: Youtube))

21 व्या शतकात बॉलीवूड अधिक बोल्ड आणि आधुनिक झाले. आजकाल जवळ जवळ प्रत्येक चित्रपटामध्ये किसिंग सिन्स अथवा इंटीमेट सिन्स पाहायला मिळतात. सध्या निर्माते चित्रपटांना अजून बोल्ड करण्यासाठी गाण्यातील गीतांच्या बोलांचाही आधार घेताना दिसून येतात. तरुणांना आकर्षित करून घेण्यासाठी बरेचवेळा गाण्यांमध्ये ‘डबल मिनिंग’ शब्दांचा वापर केला जातो. आयटम सॉंगच्या नावाखाली आजकाल अशा प्रकारची गाणी खपवली जातात.

पण तुम्हाला माहित आहे अशा प्रकारची डबल मिनिंगची गाणी बॉलिवूडमध्ये फार पूर्वीपासूनच बनत आहेत. आधीच्या काळात चित्रपटांमध्ये रोमान्स करण्याचे प्रतिक म्हणून दोन फुलांचा वापर करण्यात येत असे, मात्र 80, 90च्या दशकात अनेक गाण्यांमध्ये रोमान्स दाखवण्यासाठी काही ठराविक शब्दांचा वापर केला गेला. ही गाणी एकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. चला तर पाहूया मनोरंजनाच्या नावाखाली आपण कोणती डबल मिनिंगची गाणी पाहत होतो

सरकाईलो खटीया (राजा बाबू)

गोविंदा आणि करिष्मा कपूर यांचा राजाबाबू त्यावेळी फारच गाजला होता. प्रेक्षकांनी यातील गाण्यांनाही पसंती दिली होती. याच चित्रपटामधील एका गाण्यामध्ये गोविंदा आणि करिष्मा पूर्ण कपड्यात रोमान्स करताना दिसून येतात. गाण्यात जरी ते पूर्ण कपड्यात असले तरी गाण्याचे शब्द मात्र काही वेगळेच संकेत देतात, विश्वास बसत नाही ना? हे गाणे पाहा आणि स्वतः खात्री करून घ्या.

ये माल गाडी तू धक्का लगा (अंदाज)

रेल्वेची पार्श्वभूमी असलेले हे गाणे अनिल कपूर आणि जुही चावला यांच्या लग्नाच्या रात्रीचे आहे. गाण्याचे बोल ऐकल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की या गाण्यातली मक्की मालगाडी कोणती आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल हा चित्रपट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे माजी अध्यक्ष पंकज निहलानी यांची निर्मिती आहे.

सुबह को लेती है, दिन में लेती है, रात में लेती है (अमानत)

राज एन. सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामधील हे गाणे. गाण्याचे सुरुवातीचे बोल जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपलाच आपल्या कानांवर विश्वास बसत नाही, मात्र पुढच्याच ओळीत गीतकार आपण जो विचार करतोय तो चुकीचा असल्याचे दाखवून देतो. मात्र तो पर्यंत आपल्या विचारांनी जिथपर्यंत पोहोचायचे असते तिथपर्यंत ते पोहचलेले असतात. संजय दत्तवर चित्रित झालेले गाणे अन्वर सागर यांनी लिहिले आहे तर याला संगीत दिले आहे बप्पी लहरी यांनी.

हम तो तंबू में बंबू लगाये बैठे (मर्द)

बॉलिवूड मधील ही डबल मिनिंगची गाणी काही मोठ्या कलाकारांवर देखील चित्रित झाली आहेत, त्यातीलच एक नाव अमिताभ बच्चन. ऐकून आश्चर्य वाटले ना ? तर मग तुम्हाला मर्द चित्रपटामधील हे गाणे पाहावेच लागेल.

तेरी लेलू बाहें (तेरे मेरे बिच में)

दादा कोंडके यांनी आपल्या ‘तेरे मेरे बिच में’ या 1984 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे हिंदीमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट त्यांचा गाजलेला मराठी चित्रपट ‘राम राम गंगा राम’चा हिंदी रिमेक होता. यातीलच दादा आणि जयश्री टी यांच्यावर चित्रित झालेले, महेंद्र कपूर आणि अलका याग्निक यांनी गायलेले हे गाणे ऐकले तर विश्वास बसणार नाही की अशा प्रकारची गाणी प्रत्यक्षात बनलेली होती. गाणे ऐकताना तासेले काही विचार डोक्यात आले तर थांबा, गाणे पूर्ण ऐका आणि मग ठरवा.

चोली के पीछे क्या है (खलनायक)

माधुरी दिक्षित आणि संजय दत्त यांचा खलनायक त्यावेळचा सुपरहिट ठरलेला चित्रपट होता. चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झालेली होती. असेच माधुरी आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे, त्याचे संगीत, माधुरीचे नृत्य यांपेक्षा गाण्याच्या शब्दांमुळेच लोकप्रिय ठरले.