2002 साली प्रदर्शित झालेल्या संजय लीला भंसाली दिग्दर्शित देवदास चित्रपटाने इतिहास घडवला होता. त्यावेळच्या या सर्वात महागड्या चित्रपटाने कित्येक पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली होती. याचसोबत बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली होती. म्हणूनच चित्रपटाच्या मेकिंगच्या कथा आजही बॉलीवूडमध्ये चवीने रंगवल्या जातात. अशातच आज इतक्या वर्षानंतर या चित्रपटाच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवणारी एक गोष्ट घडली आहे. नुकतेच युकेमधील एका वर्तमानपत्राने बॉलीवूड मधील ‘सर्वोत्कृष्ट 50 गाण्यां’ची यादी जाहीर केली. या यादीमध्ये देवदास चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गाण्याला बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट नृत्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
इंग्लंडचे आघाडीचे वृत्तपत्र ‘इस्टर्न आय’ ने नुकताच याबबत एक पोल घेतला होता. यामध्ये जनतेचे मत, सिनेमॅटिक इम्पॅक्ट, कोरिओग्राफी आणि डान्स कोरिओग्राफीच्या आधारावर सर्वोत्कृष्ट गाण्यांची निवड करण्यात आली. या वृत्तपत्राने डोला रे डोला या गाण्याचा समावेश लोकप्रिय आणि आघाडीच्या गाण्यांच्या यादीमध्ये केला आहे. या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे ते, 1960 च्या क्लासिक मुघले आझम चित्रपटातील गीत ‘प्यार किया तो डरना क्या’ ला. तर माधुरीच्याच अजून एका गाण्याने या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे, ते गाणे म्हणजे ‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दोन तीन’. या यादीत ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातील गाणे ‘इक पल का जिना’ आणि वैजयंतीमालाचे ज्वेलथीफ चित्रपटातील गीत ‘होठों पे ऐसी बात’ ने अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान पटकावले आहे.
डोला रे डोला हे गीत बॉलीवूडमधील दोन महत्वाचे स्टार्स माधुरी आणि ऐश्वर्या यांच्यावर चित्रित झाले आहे. या गीताचे नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केले होते, यासाठी त्यांने कथ्थक आणि भरतनाट्यम यांचा सुरेख संगम साधला होता. या गीतासाठी सरोज खान यांना फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहेत. कविता कृष्णमुर्ती आणि श्रेया घोशाल यांनी हे गीत गायले आहे. ‘देवदास’ या चित्रपटाला आतापर्यंत पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून ‘टाइम्स मासिका’नेही या चित्रपटाचा समावेश टॉप 10 चित्रपटांच्या यादीत केला आहे.