जागतिक कन्या दिन : बॉलिवूडवर राज्य करत आहेत या सुपरस्टार्सच्या कन्या
करीना कपूर व सोनं कपूर (Photot credit : DNA india)

आज जगभरात ‘डॉटर्स डे’ साजरा केला जात आहे. आई-वडिलांच्या मनात मुलीबद्दल असलेल्या प्रेमाचा हा दिवस. आज प्रत्येक क्षेत्रात मुलींचा वावर जाणवतो, ‘सातच्या आत’ ही परिस्थिती बदलून अगदी परदेशातही मुली स्वतःचे स्वतंत्र जग निर्माण करताना दिसत आहेत. आणि हे घडतंय आई वडिलांची प्रेरणा आणि त्यांनी दिलेल्या पाठींब्यामुळेच. बॉलिवूडमध्येही आज अनेक सुपरस्टार्सच्या मुलींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्या बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहेत. फक्त बॉलिवूडच नव्हे तर आतंरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटला आहे. चला तर आज डॉटर्स डे निमित्त जाणून घेऊया अशा अभिनेत्रींबद्दल ज्या आहेत बॉलिवूड सुपरस्टारच्या मुली

काजोल

तनुजाची मुलगी काजोल आज गेली 25 वर्षे बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे. 1992 मध्ये काजोलने 'बेखुदी' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आपली आई आणि मावशी नूतनकडून अभिनयाचा वारसा घेतलेल्या काजोलने फार मोजकेच चित्रपट केले, पण तिच्या प्रत्येक चित्रपटामधील भूमिकेचे कौतुक झाले. काजोलला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून तिने आत्तापर्यंत 6 फिल्मफेअर पुरस्कार मिळवले आहेत.

आलिया भट्ट

आलिया भट्टचा चित्रपटसृष्टीमधील प्रवास हा थक्क करणारा आहे. महेश भट्ट यांची मुलगी आलिया इतक्या कमी वेळात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे हे आश्चर्य म्हणावे लागेल. 'स्टुडंट ऑफ द ईयर' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवला होता. 'हायवे', 'राझी', '2 स्टेट्स', 'डियर जिंदगी', 'उडता पंजाब' या चित्रपटांमधील आलियाच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते.

सोनाक्षी सिन्हा

शत्रुघ्न सिन्हाच्या या मुलीने सलमान खानसोबत दबंग या चित्रपटामधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाने सोनाक्षीला बरेच पुरस्कार मिळवून दिले. लुटेरा चित्रपटामधील सोनाक्षीच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. सोनाक्षीला अभिनयाबरोबरच फॅशन डिझायनिंगमध्येही रस आहे.

श्रद्धा कपूर

बॉलिवूडचा खलनायक शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर हिने 2010च्या 'तीन पत्ती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'आशिकी 2' या चित्रपटाने श्रद्धा कपूरला खरी ओळख निर्माण करून दिली. सध्या तिचा गाजत असलेला चित्रपट स्त्रीमुळे श्रद्धा इंस्टाग्रामवर ट्रेंडीग अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या नंबरवर आहे. स्त्री या चित्रपटाने आत्तापर्यंत 150 पेक्षा जास्त कमाई केली आहे.

करीना कपूर

2000 साली आलेला 'रिफ्युजी' हा करीना कपूरचा पहिला चित्रपट होय. या चित्रपटासाठी करीनाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. मात्र जब वी मेट या चित्रपटापासून करीनाच्या करिअरने भरारी घेतली आणि आज तिचे नाव बॉलिवूडमधील अग्रगण्य अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. करीना ही रणधीर कपूर आणि बबिता कपूर यांची मुलगी आहे.

सोनम कपूर

अभिनयासोबतच बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून आज सोनम कपूरकडे पहिले जाते. अनिल कपूरच्या या मुलीने भन्साळींच्या सांवरियामधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा चित्रपट पडला मात्र त्यातून सोनमच्या अभिनयाची चुणूक सर्वांना दिसली. नीरजा चित्रपटासाठी सोनमला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

याव्यतिरिक्त जान्हवी कपूर या श्रीदेवी कन्येने धडक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाय ठेवला आहे. तर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही सुद्धा आपला बॉलिवूड डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे.