Sunil Pal (Photo Credit: Twitter)

स्टॅंड अप कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal) यांच्याविरूद्ध मुंबईतील (Mumbai) अंधेरी पोलिस ठाण्यात (Andheri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम आपले कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांची खिल्ली उडविण्याचा आणि त्याच्याविरूद्ध अपमानजनक शब्दांचा वापर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सुनील पाल यांनी आपल्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये कोविड संकटाच्या नावाखाली डॉक्टर माणसांची तस्करी करत असल्याचे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत सुनील पाल म्हणाले की, 'डॉक्टर हे देवाचे रुप आहे. परंतु, 90 टक्के डॉक्टरांनी राक्षसाचे रुप धारण केले आहे. दरम्यान, रुग्णांची फसवणूक केली जात आहे. गरीब लोकांच्या मनात भिती पेरली जात आहे. रुग्णालयात बेड नाहीत, प्लाझ्मा नाही, ड्रग्स नाहीत, असे सांगून त्यांना त्रास दिला जात आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगत त्यांना सक्तीने रुग्णालयात दाखल केले जात आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्या नावावर बिल भरले जात आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराच्या अवयवांची तस्करी केली जात आहे", असे पाल म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Kangana Ranaut Twitter Account Suspended: कंगना रनौत हिचे ट्विटर अकाऊंट निलंबीत, वादग्रस्त ट्विट करणे भोवले

सुनील पाल यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर करत डॉक्टरांची माफी मागितली होती. तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून केवळ मोजक्या डॉक्टरांना लक्ष्य केल्याचे त्यांनी सांगितले होते. जर माझ्या वक्तव्यामुळे डॉक्टरांना त्रास झाला असेल तर, मी माफी मागतो आणि माझे शब्द मागे घेतो. डॉक्टर खरोखर देवाचे एक रूप आहेत, असे ते म्हणाले होते.

सुनील पालचा हा व्हिडिओ 20 एप्रिल रोजी समोर आला होता. यानंतर डॉक्टरांच्या गटाने अंधेरी पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता त्याच प्रकरणातील चौकशीनंतर आयपीसीच्या कलम 500 आणि कलम 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.