Super 30: बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन च्या 'सुपर 30'ची धूम, दोन दिवसात बक्कळ कमाई
Hrithik Roshan in Super 30 (Photo Credits: Twitter)

Super 30 Box Office Collection: अखेर हृतिक रोशन (Hrithik Roshan) याचा महत्वकांक्षी आणि बहुप्रतिक्षित सिनेमा 'सुपर 30' (Super 30) या 12 जुलै रोजी प्रदर्शित झाला. गणितज्ञ आनंद कुमार (Anand Kumar) यांचा बायोपिक असणाऱ्या या चित्रपटाची बरीच चर्चा रंगली होती. आता बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट आपली कमाल दाखवत आहे. या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांमध्ये 30 कोटींची कमाई केली आहे. आजचा दिवस पकडून तीन दिवसांत हा चित्रपट 50 कोटी पार करेल अशी अपेक्षा आहे.

हृतिक रोशन याने आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे. त्यात यामध्ये बिहारची पार्श्वभूमी असल्याने हृतिकचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 26 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कंगना रनौत हिच्या 'मेंटल है क्या' सिनेमाशी होणारी टक्कर टाळण्यासाठी सिनेमा लवकर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील चित्रपटात महत्वाची भूमिका बजावत आहे. (हेही वाचा: 'सुपर 30' सिनेमाचा दमदार ट्रेलर आऊट; बिहारी सुपरहिरोच्या रुपात हृतिक रोशन याने जिंकली प्रेक्षकांची मने)

आनंद कुमार यांचा सुपर 30 नावाचा शैक्षणिक प्रोग्रॅम, श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील शैक्षणिक दरी, गरीब मुलांना दाखवलेली योग्य दिशा, त्यांची स्वप्ने अशा सामाजिक विषयाभोवती हा चित्रपट फिरतो. चित्रपटाची बरीच चर्चा आधी झाल्यामुळे, कंगनासोबतच्या वादाचा पब्लिसिटीसाठी बराच फायदा झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.83 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 18.19 कोटी इतकी कमाई केली आहे.