अभिनेता Vivek Oberoi चे असेही एक रूप; 18 वर्षात जवळजवळ अडीच लाख कर्करोगग्रस्त मुलांना केली आहे मदत
विवेक ओबेरॉय (Photo Credits: Instagram)

4 फेब्रुवारी रोजी, जगभरात कर्करोगाबाबत (Cancer) जनजागृती करण्यासाठी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. कर्करोग निर्मूलन मोहिमेमध्ये अनेक सेलिब्रिटी आपले योगदान देत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा (Vivek Anand Oberoi) समावेश आहे, जो सलग 18 वर्षे या कामात गुंतलेला आहे. भलेही विवेक आता अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसत असो, परंतु सामाजिक कार्यामध्ये तो खूप सक्रिय आहे. गेल्या 18 वर्षात विवेकने वंचित अशा अडीच लाखांहून अधिक मुलांना कर्करोगाशी भावनिक आणि आर्थिक लढा देण्यासाठी मदत केली आहे.

2004 मध्ये तो कर्करोग रुग्ण आणि संघटना (CPAA) शी जोडला गेला. असोसिएशनच्या सहाय्याने विवेकने टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या बाहेर फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबांची मदत केली. त्यांना राहण्यासाठी जागा दिली आणि कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी त्यांच्या मुलांना आर्थिक सहाय्य देखील केले. यासह विवेकने अशा शेतकर्‍यांनाही मदत केली होती, ज्यांना कर्जासाठी आपले घर व जमीन गहान ठेवावी लागली होती. याबाबत विवेक म्हणाला, ‘कोणत्याही मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये हे सुनिश्चित करणे हे माझे कर्तव्य आहे, कारण बरेच पालक कर्करोगाचा उपचार आणि खर्च घेऊ शकत नाहीत. जर ही लढाई जिंकण्याचा हा मार्ग असेल तर प्रत्येक मुलास संधी मिळायला हवी.’ (हेही वाचा: Sonu Sood ने परत घेतली सुप्रीम कोर्टातील BMC च्या नोटीसी विरोधातील याचिका)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

विवेकने 18 वर्षांपूर्वी आपला वाढदिवस कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मुलांसमवेत साजरा केला होता. मुलांना आनंदित करण्यासाठी, त्याने कर्करोगाची लढाई जिंकलेल्यांना आमंत्रित केले होते. कर्करोगावर मात केलेल्या लोकांनी इतरांना या रोगाशी लढण्यासाठी भावनिकदृष्ट्या आधार दिला आणि हा प्रयत्न अजूनही सुरु आहे. तरुण कर्करोगाच्या रूग्णांसमवेत व्यतीत केलेला आपला वेळ आठवताना विवेक म्हणतो, 'मला या देवदूतांना भेटण्याची आणि माझ्या क्षमतेनुसार त्यांना मदत करण्याची संधी मिळाल्याबाबत मी धन्य आहे. यांच्या चेहऱ्यावरील हास्य मला प्रेरणा देते.'