Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

समस्या कितीही मोठी असो, संकट कितीही गहिरे असो अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) लोकांच्या मदतीसाठी नेहमीच धावून येत आला आहे. कोरोना काळात अनेकांना मदत करणारा सोनू सूद आता चमोली दुर्घटनेतही मदतीसाठी पुढे सरसावला आहे. याबाबत अभिनेत्याने एक मोठे पाऊल उचलून चार मुली दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे आलमसिंह पुंडीर यांचे उत्तराखंडमधील चमोली अपघातात निधन झाले. अपघातात बळी पडलेले आलम त्यावेळी बोगद्यात कामाला होते, अशी माहिती मिडीयाने दिली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब बेघर झाले आहे. या कुटुंबाला सोनू सूदने मदतीचा हात दिला आहे.

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील आपत्तीमुळे बरेच लोक बेघर झाले आहेत, तर अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. इतकेच नव्हे तर सरकारी आकडेवारीनुसार आपत्तीनंतर 204 लोक बेपत्ता झाले. सैन्य, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपी, बीआरओ इत्यादी जवान हरवलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत, परंतु, दुर्दैवाने, 12 दिवसानंतरही 174 कामगार गायब आहेत. मात्र आता आलमसिंह पुंडीर यांच्या चार मुलींची माहिती मिळताच सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. स्वत: सोनू सूदने ट्विटर अकाऊंटवर या मुलींच्या फोटोसह ट्वीट केले आहे व म्हटले आहे की, ‘हे कुटुंब आता माझे आहे.’

सोनूला या कुटुंबातील चार मुलींना दत्तक घ्यायचे आहे, असे अभिनेत्याच्या टीमने सांगितले आहे. ते त्यांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत खर्च करण्यास तयार आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना सोनू सूद म्हणाला की, ‘कठीण काळात मदतीचा हात देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या दुर्घटनेमुळे आयुष्य विध्वंस झालेल्या लोकांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे.’ (हेही वाचा: हेल्मेट आणि मास्क न घालता बाईक चालवल्याने बॉलिवूड अभिनेता Vivek Oberoi वर मुंबई पोलिसांची कारवाई)

दरम्यान, हे पहिल्यांदाच नाही जिथे सोनू सूद मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. गेल्या वर्षी बिहार आणि आसाममध्येही पुराचा प्रादुर्भाव दिसून आला होता, तेव्हा तिथेही सोनू सूदने बरीच मदत केली होती.