COVID-19 Insurance घेणारा तापसी पन्नू हिचा Looop Lapeta ठरणार पहिला बॉलिवूड सिनेमा; निर्माता अतुल कसबेकर यांचा निर्णय
Atul Kasbekar, Taapsee Pannu (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे सिनेमांचे शूटिंग आणि प्रदर्शन सारं काही रखडलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा काही नियमांच्या आधारे शूटिगंसाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु, सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या आरोग्याची खबरदारी घेतल्याशिवाय शूटिंग सुरु करणे धोकादायक ठरु शकते. त्यामुळेच आगामी सिनेमा 'लूप लपेटा' (Loop Lapeta) च्या टीमसाठी कोविड-19 चा विमा (COVID-19 Insurance) उतरवण्यात येणार असल्याची माहिती सिनेमाचे निर्माते अतुल कसबेकर (Atul Kasbekar) यांनी दिली आहे. या सिनेमात तापसी पन्नू (Taapsee Pannu) प्रमुख भूमिकेत आहे. दरम्यान भविष्यातील प्रोजेक्ट्समध्येही कोविड-19 च्या इन्शुरन्सची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Looop Lapeta हा जर्मन सिनेमा Run Lola Run चा रिमेक असणार आहे. याची निर्मिती Ellipsis Entertainment अंतर्गत करण्यात आली असून कोविड-19 चे इन्शुरन्स घेणारा हा पहिला सिनेमा ठरणार आहे. कोविड-19 साठी आरोग्य विमा घेण्यासंदर्भात अतुल कसबेकर यांनी मीड-डे ला दिलेल्या माहितीनुसार, "DSK लीगलचे आनंद देसाई यांच्यासह चर्चा करुन आम्ही यासंदर्भात सल्ला घेत आहोत. एखादा कलाकार आजारी पडला किंवा नैसर्गिक आपत्ती यामुळे सिनेमाचे शेड्युल बिघडू शकते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा अंतर्भाव इन्शुरन्स मध्ये असावा या दृष्टीने आम्ही विचार करत आहोत."

कोविड-19 हा नवा आजार असल्याने इन्शुरन्समध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असेल, याचाही आम्ही विचार करत आहोत. कारण सिनेमाच्या टीममधील एका जरी सदस्याला कोरोनाची लागण झाली तर सर्व टीमला क्वारंटाईन होणे आवश्यक आहे. परिणामी शूटिंगला विलंब होणार. त्यामुळे इन्शुरन्समध्ये कोणत्या सुविधा मिळणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे.

Looop Lapeta या सिनेमात तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमात आऊटडोअर शूट अधिक आहे. तसंच दिवाळी पूर्वी सिनेमाचे शूट सुरु करण्याचा मानस असल्याचेही अतुल कसबेकर यांनी स्पष्ट केले.