
बॉलिवूड निर्माता आणि टी-सीरिजचे (T- Series) व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार (Bhushan Kumar) यांच्याविरूद्ध बलात्काराचा (Rape)आरोप (FIR) दाखल करण्यात आला आहे. भूषणने मुंबईत (Mumbai) आपल्या कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने 30 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरूद्ध मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुलशन कुमारांचा (Gulshan Kumar) मुलगा भूषण कुमारने सोशल मीडियावर महिलेची छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसिद्ध करुन तिला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2017 ते 2020 या कालावधीत तिच्यावर तीनदा बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. मुंबई पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार या महिलेचा आरोप आहे की तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले गेले आणि अत्याचार केले. टी-सीरीजमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून भूषण कुमारने बलात्कार केल्याचे तिने सांगितले. भूषण कुमारविरोधात महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली कलम 376 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मात्र याप्रकरणी अजूनही कोणाला अटक करण्यात आलेली नाही. भूषण कुमार किंवा त्यांची पत्नी दिव्या खोसला कुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत कोणतेही विधान केलेले नाही.
याआधीही भूषण कुमारवर मॉडेल आणि अभिनेत्री मरीना कुंवर यांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. 2018 मध्ये जेव्हा मीटू (Me too) चळवळ देशात वेग वाढली, तेव्हा मेरीनाने आपल्या एका मुलाखतीत खुलासा केला की भूषण कुमार आणि साजिद खान या दोघांनीही लैंगिक छळ केला आहे. टी-सीरीज ही एक संगीत आणि फिल्म प्रोडक्शन कंपनी आहे, ज्याची स्थापना गुलशन कुमार यांनी केली होती.