SwatantraVeer Savarkar | Photo Credits: Twitter/ Taran Adarsh

मराठी, हिंदी सिनेमांमध्ये बायोपिक अर्थात जीवनपटांना देखील रसिकांनी मोठी दाद दिली आहे. रूपेरी पडद्यावर जीवनपटांच्या मालिकेमध्ये आता अजून एका चित्रपटाची भर पडणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) अर्थात विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या जीवनावर देखील नवा सिनेमा येणार आहे. आज वीर सावरकर यांच्या 138 व्या जयंतीचं औचित्य साधत 'SwatantraVeer Savarkar' या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिने समिक्षक तरण आदर्श (Taran Adarsh) ने केलेल्या ट्वीट मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. मराठमोळे पण हिंदी सिनेमामध्येही दबदबा असलेले महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

महेश मांजरेकरांच्या वीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचं नाव 'स्वातंत्र्यवीर सावरकर' असं आहे. आज वीर सावरकर जयंती निमित्त सिनेमाच्या पोस्टरची पहिली झलक देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोबतच या सिनेमाची निर्मिती संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी केली आहे. लेखन महेश मांजरेकर आणि ऋषी विरमाणी यांनी केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर पोस्टर

तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चरित्रपटाचं शूटिंग हे लंडन, अंदमान आणि महाराष्ट्राच्या इतर भागात होणार आहे. दरम्यान सावरकर यांचे निवासस्थान दादर मध्ये आहे. महाराष्ट्रात वीर सावरकरांवरून मागील काही दिवसांत राजकीय पक्षांकडून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक उलटसुलट गोष्टी समोर आणण्यात आल्या होत्या त्यामुळे 'वाद' टाळत कलाकृती समोर आणण्याचं अजून एक नवं आव्हान महेश मांजरेकरांसमोर आहे. यापूर्वी महेश मांजरेकरांनी पुल देशपांडे यांच्यावरील चरित्रपट दोन भागांमध्ये रसिकांसमोर आणला होता.