Sushant Singh Rajput ची हत्या झाली; शरीरावर अनेक जखमा आढळल्याचा पोस्टमॉर्टम रूममध्ये उपस्थित कर्मचाऱ्याचा दावा
Sushant Singh Rajput (Photo Credits: Facebook)

चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) 14 जून 2020 रोजी गळफास लावून आत्महत्या केली, परंतु अभिनेत्याच्या मृत्यूनंतर अनेकदा ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे बोलले जात होते. सुशांत आत्महत्या प्रकरणात आजही अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत, ज्या धक्कादायक आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याला पोस्टमॉर्टमसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता जवळजवळ अडीच वर्षांनंतर, सुशांत सिंगच्या पोस्टमॉर्टम रूममध्ये उपस्थित शवागाराचा सेवक रूपकुमार शाह यांनी मोठा खुलासा केला आहे.

रूपकुमार शाह यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. TV9 मराठीशी बोलताना रूपकुमार शाह म्हणाले, ‘जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा पाच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आले होते. त्यात एक व्हीआयपी बॉडी असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. जेव्हा आम्ही पोस्टमॉर्टमसाठी गेलो तेव्हा आम्हाला कळले की तो सुशांत सिंग राजपूत आहे. त्याच्या शरीरावर अनेक खुणा होत्या आणि त्याच्या मानेवरही दोन-तीन खुणा होत्या. पोस्टमॉर्टमचे रेकॉर्डिंग व्हायला हवे होते, पण उच्च अधिकाऱ्यांनी आम्हाला फक्त मृतदेहाचे फोटो क्लिक करायला सांगितले.’

ते म्हणाले, ‘जेव्हा मी सुशांतचा मृतदेह पाहिला तेव्हा मी वरिष्ठांना सांगितले की, मला वाटते की ही आत्महत्या नसून हत्या आहे. म्हणून आपण त्याच पद्धतीने काम केले पाहिजे. पण मला सांगितले की तू तुझे काम कर. माझे काम शरीर कापून शिवणे होते, जे मी केले. मृतदेहाच्या शरीरावरील कपडे काढले असता शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. मानेवर दोन-तीन ठिकाणी जखमेच्या खुणा होत्या.’

(हेही वाचा: बॉयफ्रेण्ड शिजानने दिला तुनिषाला धोका, तुनिषा शर्माच्या आईने व्हिडीओ शेअर करत केला मोठा खुलासा)

रूपकुमारचा दावा आहे की, सुशांतच्या मानेवरील खुणा आत्महत्येसारख्या नसून हत्येसारख्या वाटत होत्या. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर अशा कोणत्याही जखमेच्या खुणा नसतात. रूपकुमार शाह शवागार सेवक म्हणून काम करतात. दरम्यान, 14 जून 2020 रोजी दुपारी अचानक सुशांत सिंग राजपूतच्या निधनाची बातमी समोर आली होती. त्याचा मृतदेह वांद्रे येथील अपार्टमेंटमधून ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात मुंबई पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर सुशांतच्या वडिलांनी पटना येथे एफआयआर दाखल करून आरोप केला होता की त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. सध्या या प्रकरणाची फाईल सीबीआयकडे असून अद्यापपर्यंत संस्थेने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.