Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूत याच्या घरातून मुंबई पोलिसांनी जप्त केल्या 5 डायऱ्या
Sushant Singh Rajput (Photo Credit: Instagram)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर केवळ बॉलिवूडलाच नाही तर संपूर्ण देशाला जबर धक्का बसला आहे. बॉलिवूड कलाकार, राजकीय नेते, चाहते सर्वच सुशांतने घेतलेल्या अकाली एक्झिटनंतर हळहळले आहेत. 14 जून रविवारी सुशांत याने वांद्रे (Bandra) येथील आपल्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. त्यानंतर आता मुंबई पोलिस (Mumbai Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. व्यावसायिक दृष्टीनेही सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. दरम्यान नैराश्यातून सुशांतने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात असले तरी या घटनेचा विविध बाजूने विचार केला जात आहे. (सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी करण जोहर, सलमान खान, संजय लीला भन्साळी, एकता कपूर यांच्यासमवेत 8 जणांविरोधात मुजफ्फरपूर कोर्टात तक्रार दाखल)

सुशांतच्या नैराश्याबद्दल काही ठाऊक नसल्याचे अलिकडेच सुशांतच्या वडीलांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांना सुशांतच्या घरातून 5 डायऱ्या मिळाल्या असल्याची नवी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या डायऱ्यांच्या आधारे सुशांतच्या आयुष्याबद्दल अधिक माहिती मिळते का? याचा पोलिस तपास करत आहेत. कदाचित या डायऱ्यांमधील माहितीमुळे सुशांतच्या आयुष्यातील गुपितं उलघडू शकतात. त्याचबरोबर पोलिस त्याच्या जवळच्या व्यक्तींचा जबाब नोंदवत आहेत. अलिकडेच 'दिल बेचरा' या सुशांतच्या आगामी सिनेमाचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांचा जबाब घेण्यात आला. मुकेश छाब्रा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुशांत अत्यंत इंट्रोव्हर्ड होता आणि त्याला पुस्तक वाचनाचा छंद होता. तसंच त्याला व्यावसायिक विरोधकांची जाणीव नसल्याचेही त्यांनी सांगितले. आज सुशांतची जवळची मैत्रिण, कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही देखील चौकशीसाठी वांद्रे पोलिस स्थानकात दाखल झाली होती.

त्याचबरोबर मुंबई पोलिस सुशांतचे मॅनेजर सिद्धार्थ पिठानी यांचीही कसून चौकशी करत आहेत. सुशांतच्या दुःखाबद्दल सोशल मीडिया पोस्ट करणारे दिग्दर्शक शेखर कपूर यांची देखील मुंबई पोलिस चौकशी करणार आहेत.