Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याचे प्रसारमाध्यमांतील वृत्त चुकीचे; CBI ने दिले 'हे' स्पष्टीकरण
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

14 जून रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळला होता. काल या गोष्टीला चार महिने पूर्ण झाले. या दरम्यान सुशांतसिंह राजपूतचे चाहते, त्याचे कुटुंबीय तसेच इंडस्ट्रीमधील काही मंडळीनी सुशांतचा खून झाला असल्याचा दावा केला होता. याबाबत केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) तपासणी करत आहे. मात्र आता सीबीआयचा या प्रकरणामधील तपास पूर्ण झाला असून, या तपासात सुशांतच्या हत्येचा पुरावा आढळून आला नसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. आता सीबीआयने यावर स्पष्टीकरण देत माध्यमांचा हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.

सीबीआयने सांगितले आहे, ‘केंद्रीय अन्वेषण ब्युरो अजूनही सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूची चौकशी करत आहे. मात्र मीडियामध्ये असे काही अहवाल प्रसारित झाले त्यामध्ये म्हटले होते की, या प्रकरणामध्ये सीबीआय एका निष्कर्षावर पोहोचली आहे व या तपासात सुशांतच्या हत्येचा पुरावा आढळून आला नाही. माध्यमांचे हे अहवाल पूर्णतः चुकीचे आहेत.’

एएनआय ट्वीट -

गेल्या चार महिन्यांमध्ये सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. 25 जुलै रोजी सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, रियाचे वडील इंद्रजित, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, मॅनेजर सम्युल मिरांडा, श्रुती मोदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणामध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टीने तपासणी सुरू केली होती. सध्या सीबीआय या प्रकरणाची तपासणी करत आहे. (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची CBI चौकशी पूर्ण, हत्येचा कोणताही पुरावा मिळाला नाही; प्रसारमाध्यमांचा दावा)

दरम्यान, 14 जून रोजी सुशांतसिंह राजपूत मुंबई उपनगरातील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता तुरुंगात 1 महिना घालविल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाला जामीन मंजूर केला आहे.