बेघर लोकांच्या मदतीला धावला Sonu Sood; आपल्या पोर्टलच्या माध्यमातून नोएडामध्ये 20 हजार प्रवासी कामगारांना ऑफर केले घर
Sonu Sood (PC - Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या आजाराचा कहर अजूनही देशभर सुरूच   आहे. या साथीच्या आजाराचा सर्वाधिक परिणाम गरीब आणि स्थलांतरित कामगारांवर झाला आहे. आपत्तीच्या या वाईट काळात या प्रवासी कामगारांना मदत करून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) एखादा मसीहा बनला आहे. ज्या लोकांकडे आपल्या घरी जाण्यासाठी पैसे नाहीत, अशा लोकांना सोनू सूदने वाहतुकीची व्यवस्था करून दिली. आता पुन्हा एकदा सोनू सूदने एक उत्तम काम केले आहे, असे काम जे सरकारही सहज करू शकत नाही. सोनू सूदने 20 हजार स्थलांतरित कामगारांना नोएडामध्ये घर देण्याची ऑफर दिली आहे.

सोनुने स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. 20 हजार कामगारांसाठी घरे बांधण्याचे काम नॅशनल असोसिएशन फॉर एलिव्हेशन कॉन्ट्रॅक्टर्सचे अध्यक्ष ललित ठुकराल यांच्यासह करणार असल्याचे त्याने लिहिले आहे. आपल्या ट्वीटमध्ये तो म्हणतो, ‘प्रवासी रोजगार'मार्फत नोएडामधील कपड्यांच्या युनिट्समध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 20 हजार स्थलांतरित कामगारांना, राहण्याची सोय करून देण्यात येत आहे व हे सांगताना मला आनंद होत आहे. एनएईसीचे अध्यक्ष श्री ललित ठुकराल यांच्या पाठिंब्याने आम्ही या उदात्त कारणासाठी संपूर्ण चोवीस तास काम करू.’ (हेही वाचा: Sonu Sood बनला फिलिपाईन्स मध्ये अडकलेल्या भारतीयांचा आधार; विद्यार्थी व देशवासियांच्या घरवापसी साठी सुरु केली मोहिम)

सोनू सूद ट्वीट -

याआधी, आपल्या 47 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनू सूदने घोषित केले होते की, आता तो परप्रांतीयांना नोकरी मिळवून देण्यात मदत करणार आहे. त्यासाठी त्याने 'प्रवासी रोजगार' नावाचे अॅपदेखील लाँच केले. सोनू सूदने आपल्या प्रयत्नातून 58 परप्रांतीयांना नोकरी दिली आहे व आता तो लोकांना घरे देणार आहे. दरम्यान याआधी सोनू सूदने त्याच्याकडे दिवसागणिक किती लोक मदत मागतात त्याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार, 1137 ईमेल, 19,000 फेसबुक मेसेज, 4,812 इन्स्टाग्राम मेसेज, 6,741 ट्विटर मेसेज, असे आकडे सोनू सूदने शेअर केले होते.