गायिका Anuradha Paudwal यांची अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर बंद करण्याची मागणी; म्हणाल्या- 'इतर देशात असे प्रकार होत नाहीत मग भारतामध्येच का?'
गायिका अनुराधा पौडवाल(Photo credits: File Image)

गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) त्यांचा मधुर आवाज आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यासाठी जगभरात ओळखल्या जातात. त्यांनी गायलेली भजने आजही लोक ऐकतात. त्यांची चित्रपटातील गाणीदेखील रसिकांच्या ओठावर घोळत असतात. आता अनुराधा पौडवाल यांनी लाऊडस्पीकरवरील अजानच्या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. अनुराधा पौडवाल म्हणतात, भारतात अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर आता बंद व्हायला हवा. देशात अशा पद्धतीची गरज नाही. अनुराधा पौडवाल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्या जगातील अनेक ठिकाणी फिरल्या आहेत, पण भारतामध्ये जसे घडते तसे इतरत्र कुठेही होत नाही.

त्या पुढे म्हणाल्या, ‘मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही पण इथे विनाकारण गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात अजान वाजवली जाते, त्यामुळे इतरांना वाटते की आपण आपला लाऊडस्पीकर का वापरू नये?’ त्यांनी पुढे सांगितले की त्या मध्यपूर्वेतील देशांमध्येही गेल्या आहेत आणि तिथे लाऊडस्पीकरवर बंदी आहे. मुस्लिम देशांमध्ये लाऊडस्पीकरवर अजान वाजवली जात नाही, मग आपल्याकडे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्या म्हणाल्या, ‘ही प्रथा अशीच सुरू राहिल्यास लोक लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवू लागतील. यामुळे निर्माण होणारे वातावरण चांगले असणार नाही.’ नवरात्री आणि रामनवमीच्या निमित्ताने अनुराधा पौडवाल यांनी तरुणांना संदेश दिला. त्या म्हणाल्या की, मी एवढेच म्हणेन की सर्वांनी एकत्र राहावे. आदि शंकराचार्य हे आपले धर्मगुरू आहेत आणि आपल्याला हे माहित असले पाहिजे, प्रत्येक ख्रिश्चनाला पोपबद्दल माहिती असेल आणि त्याच प्रमाणे आपल्या संस्कृतीबद्दलही आपल्याला माहिती असली पाहिजे. आमच्याकडे चार वेद, 18 पुराणे आणि 4 गणिते आहेत, अशा मूलभूत गोष्टी तुम्हाला माहित असाव्यात. (हेही वाचा:  राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे)

दरम्यान. लाऊडस्पीकरवर अजानवर बंदी घालण्याबाबत एखाद्या सेलिब्रिटीने बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी लोकप्रिय गायक सोनू निगमने लाऊडस्पीकरवर अजान विरोधात आवाज उठवला होता. आपल्या डिलीट केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी रोज सकाळी लाऊडस्पीकरवर अजान ऐकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.