
Siddharth Malhotra's New Film Poster: सिद्धार्थ मल्होत्रा याचा 35 वा वाढदिवस हा त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक ट्रीट ठरणार आहे. कारण गुरुवारी सकाळी (त्याच्या वाढदिवशी), आर्मी दिनाच्या एक दिवसानंतर (15 जानेवारी रोजी साजरा केला जातो), चित्रपट निर्माता करण जोहर याने सिद्धार्थ मल्होत्रा च्या आगामी चित्रपटाचे तीन पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेरशहा असे या चित्रपटाचे नाव असून तो भारतीय सैन्य अधिकारी कॅप्टन विक्रम बत्रा, पीव्हीसी यांच्या बलिदान आणि पराक्रमावर आधारित असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे तीन पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले ज्यामध्ये आपल्याला सिद्धार्थ खूपच प्रभावी लुकमध्ये दिसत आहे.
सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले व लिहिले की, "मोठ्या पडद्यावर शौर्य व त्याग याच्या विविध छटा दाखवण्याचा मान मिळणे हे माझं भाग्य. #शेरशहा ही कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या आयुष्यावर आधारित ही एक रिअल स्टोरी आम्ही आणत आहोत. 3 जुलै 2020 रोजी हा चित्रपट रिलीज होत आहे."
या फोटोंमध्ये, आपण सिद्धार्थला सैन्य अधिकाऱ्याच्या डॅशिंग रूपात पाहत आहोत, जो देशासाठी आपलं कर्तव्य बजावताना दिसतो. हा लूक पूर्णपणे व्यक्तिरेखेला न्याय देतो आणि सिद्धार्थचे चाहते हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यास खूपच उत्सुक आहेत. पहा चित्रपटाचे पोस्टर्स,
चित्रपटात आपण सिद्धार्थला दुहेरी भूमिकेत पाहू शकणार आहोत. केवळ विक्रम बत्रा म्हणूनच नव्हे तर त्यांचं असलेला जुळा भाऊ विशाल यांचीही भूमिका सिद्धार्थ साकारणार आहे. दुसरीकडे, कियारा अडवाणी त्याच्या होणाऱ्या बायकोची भूमिका साकारताना दिसणार आहे. जावेद जाफरी, हिमांशू मल्होत्रा, परेश रावल हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विष्णुवर्धन दिग्दर्शित ही बायोग्राफिकल अॅक्शन फिल्म 3 जुलै 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आजच्या या खास दिवशी सिद्धार्थला आपण वाढदिवसासोबतच त्याच्या नव्या सिनेमासाठी देखील शुभेच्छा देऊया.