Tunisha Sharma Suicide Case: शीझान खानने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका; 30 जानेवारीला होणार सुनावणी
Sheezan Khan and Tunisha sharma (PC - Instagram)

Tunisha Sharma Suicide Case: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी शीजान खान याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. आरोपी शीजान खानने 23 जानेवारी रोजी जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर 30 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. याआधी आरोपी शीजान खाननेही एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती, त्यावर पुढील सोमवारी सुनावणी होणार आहे.

यापूर्वी 13 जानेवारीला शीजान खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर शीजान खानच्या वकिलाने अभिनेत्याच्या बचावासाठी अनेक युक्तिवाद केले होते. शीजान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांच्या वतीने आता अभिनेत्याला मुस्लिम असल्याने अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. शीजनचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी पालघर कोर्टात तुनिषा शर्मावर अनेक गंभीर आरोप केले. अभिनेत्याला गोवण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणी खुलासा सादर केला होता. (हेही वाचा - Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घरात सासु-सुनेचा वाद शिगेला, नवाजुद्दीनच्या आईने केली सुनेविरुध्द पोलिसात तक्रार)

तुनिषा शर्माच्या वकिलाच्या युक्तिवादाच्या आधारे पालघर न्यायालयाने शीजनचा जामीन अर्ज फेटाळला. तुनिषाच्या वकिलाने सांगितले होते की, अभिनेता शीजान हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो दिवंगत अभिनेत्री तुनिषाचा प्रियकर होता. तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो किंवा पुरावे नष्ट करू शकतो. त्यामुळे त्याला कोठडीत ठेवले पाहिजे.

दरम्यान, शीजानच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, "शीजानला केवळ धर्मामुळे अटक करण्यात आली आहे. लोक या प्रकरणाकडे लव्ह जिहादच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. त्यांनी शीझानची दोन दिवस चौकशी केली असती तर सत्य समोर आले असते. अभिनेत्याला अटक करण्याचे कोणतेही कारण नव्हते. शीजान मुस्लिम नसता तर हे प्रकरण इतकं लांबलं नसतं."

शीजान खान हा तुनिषा शर्माचा सहकलाकार आहे. अभिनेत्रीने 24 डिसेंबर रोजी 'अली बाबा: दास्तान ए काबुल'च्या शूटिंग सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर 25 डिसेंबरला शीजानला अटक करण्यात आली होती.