Sanjay Leela Bhansali Tests Positive for COVID-19: संजय लीला भन्साळी यांना कोरोना विषाणूची लागण; Gangubai Kathiawadi चे शुटींग थांबले
संजय लीला भंसाली (Image Credit: IANS)

सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी सकाळी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती, त्यानंतर आता चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या प्रकृतीविषयी बातमी समोर आली आहे. संजय लीला भन्साळी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या बातमीनंतर आता चाहते आलिया भट्टच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करत आहेत. भन्साळी सध्या त्यांच्या घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे.

बॉलिवूड हंगामा मधील बातमीनुसार, संजय यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली गेली व ते सकारात्मक असल्याचे आढळले. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी चित्रपटाचे शुटिंगही थांबवले आहे. या घटनेनंतर गंगूबाई काठियावाडीच्या संपूर्ण टीमचा कोरोनाचा धोका वाढला आहे. आता चित्रपटाशी संबंधित उर्वरित सदस्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात येईल. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.

24 फेब्रुवारी रोजी 'गंगूबाई काठियावाडी' चा टीझर रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची बातमी आहे. टीझर रिलीज झाल्याच्या तीन दिवसांनंतर संजय लीला भन्साळी यांनी अजय देवगणसोबत मुंबईतील फिल्मसिटी येथे खास उभारण्यात आलेल्या सेटवर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. या चित्रपटात अजय देवगन एका छोट्या पण एका महत्त्वाच्या रोलमध्ये दिसणार आहे. संजय कोरोना सकारात्मक आल्यावर त्यांनी सर्वप्रथम आपल्या आईची कोरोना चाचणी केली व ती नकारात्मक आली आहे. (हेही वाचा: Coronavirus In Nagpur: कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास 5 हजारापर्यंत दंड; नागपूर महानगरपालिकेचा मोठा निर्णय)

दरम्यान, गंगूबाई कठियावाडी हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कामठीपुरा येथील रहिवाशांनी चित्रपटाचा निषेध केला आहे. चित्रपटामध्ये  कामठीपुरा परिसराचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.