बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) गुरुवारी रात्री घरात चोरीच्या वेळी चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. वृत्तानुसार, पहाटे 2 च्या सुमारास तो वांद्रे येथील त्यांच्या घरी होता, तेव्हा त्याच्यावर हल्ला झाला. घटनेची माहिती मिळताच सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सैफच्या घराचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एवढ्या अतिसुरक्षेत असलेल्या व्यक्तीच्या घरात घुसून कोणी हल्ला कसा करू शकतो?, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. दुसरीकडे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक (Encounter Specialist Daya Nayak) सैफच्या घराबाहेर दिसत होते.
अहवालानुसार, दया नायक या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये दया नायक काळ्या टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहेत. सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, 'एनकाउंटर स्पेशालिस्ट ऑफिसर दया नायक संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सैफ अली खानच्या घरी पोहोचले'.
एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी दया नायक-
अशात प्रश्न निर्माण होत आहे की, कोण आहेत एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी दया नायक?. तर, महाराष्ट्र पोलिसांचे एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक 1995 मध्ये पोलिसात दाखल झाले. त्यांची पहिली पोस्टिंग जुहू पोलीस ठाण्यात झाली. 31 डिसेंबरच्या रात्री ड्युटीवर असताना त्यांना छोटा राजन टोळीच्या दोन कार्यकर्त्यांची खबर मिळाली. दया यांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल दया यांनी दोघांची हत्या केली. दया यांनी 1999-2003 दरम्यान छोटा राजन टोळीचा खात्मा केला. त्यांनी आतापर्यंत 87 हून अधिक एन्काउंटर केले आहेत. गेल्या वर्षी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपासही त्यांच्या हाती होता. त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात (ATS) तीन वर्षे काम केले आहे. (हेही वाचा: Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर विरोधक आक्रमक, शरद पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया)
Saif Ali Khan Stabbing Case:
View this post on Instagram
सैफच्या टीमचे पहिले स्टेटमेंट-
दरम्यान, सैफच्या टीमचे पहिले स्टेटमेंट हॉस्पिटलमधून समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्याच्यावर हल्ला झाला आणि यादरम्यान तो जखमीही झाला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील इतर सदस्य सुखरूप आहेत. वृत्तानुसार, डॉक्टरांची एक विशेष टीम त्याच्यावर उपचार करत आहे. सैफला झालेल्या दोन दुखापती खूप खोल आहेत आणि त्याच्या पाठीच्या कण्यावरही परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने सैफवर हल्ला केला तो एका स्टाफ सदस्याच्या मदतीने घरात घुसला होता.