Riteish Deshmukh (Photo Credits: Instagram)

भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध शहरात अनेक मजुर (Migrants Labourers) अडकले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने या मजुरांना आपल्या घरी परतण्यासाठी नियमावली जारी केली आहे. परंतु, या मजूरांकडून घरी जाण्यासाठी प्रवास भाडे आकारण्यात येत आहेत. याच मुद्द्यावरून बॉलिवुड अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक मन हेलावून टाकणारा फोटो शेअर केला आहे. यात रितेशने मजुरांना गावी जाण्यासाठी विनामूल्य रेल्वेसेवा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

रितेशने शेअर केलेल्या या फोटोमध्ये एक मजूर आपल्या वृद्ध आईला कमरेवर उचलून घेऊन पायी प्रवास करताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना रितेशने म्हटलं आहे की, 'देशातील स्थलांतरीत लोकांचा घरी परत जाण्याचा खर्च आपण उचललाचं पाहिजे. रेल्वे सेवा मोफत दिली पाहिजे. गेल्या अनेक दिवसांपासून या मजुरांना पगार देण्यात आला नाही. त्यात त्यांना राहण्यासाठी घर नाही. अशातचं त्यांना कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता अधिक आहे.' (हेही वाचा - I For India Concert: बॉलिवुड अभिनेत्री आलिया भट्टने बहिण शाहीन सोबत गायलं 'दिल है की मानता नहीं' गाणं; पहा व्हिडिओ)

दरम्यान, देशात कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. यासंदर्भात गृह मंत्रालयाने परिपत्रक जारी केलं आहे. यात परराज्यातील मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विविध राज्यातील सरकाराने आपल्या राज्यातील मजुरांना घरी आणण्याची तयारी सुरु केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला मजुरांकडून तिकीट शुल्क आकारु नये, अशी विनंती केली आहे.