ऋषि कपूर यांची तब्येत बिघडली, दिल्लीतील रुग्णालयात दाखल; रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुंबईहून रवाना
Rishi Kapoor (Photo Credit: Instagram)

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र ऋषी कपूर यांना नेमके कोणत्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल केले गेले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. एका संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच, रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुंबईहून दिल्लीला रवाना झाला. त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) देखील आहे. रविवारी सकाळी ऋषी कपूर यांची तब्येत अचानक बिघडली. काही महिन्यांपूर्वी ऋषी कपूर कर्करोगावरील एका वर्षाच्या उपचारानंतर अमेरिकेतून भारतात परतले होते.

विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून याची माहिती दिली. यामध्ये त्यांनी सांगितले आहे, दिल्ली प्रदूषणामुळे ऋषी कपूर यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या गेल्या काही काळापासून ऋषी कपूर दिल्लीत शूट करत होते. मात्र अद्याप त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. आज मुंबईत ऋषी कपूर यांची बहीण रीमा जैन यांचा मुलगा, अरमान जैनचा मेहंदीचा समारंभ पार पडणार होता. आलिया आणि रणबीरसुद्धा या सोहळ्यात परफॉर्म करणार होते.

पण अचानक ऋषी कपूर यांची तब्येत बिघडल्याने या दोघांनाही दिल्लीला यावे लागले. नीतू सिंहदेखील सध्या दिल्लीमध्येच आहेत. अजूनतरी त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, 2018 मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोगाने ग्रासाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर तातडीने त्यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे उपचारासाठी हलवण्यात आले. जवळपास वर्षभराच्या उपचारानंतर गेल्या वर्षी ते भारतात परत आले.