Rhea Chakraborty: सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी FIR दाखल केल्यावर रिया चक्रवर्ती झाली गायब? जाणून घ्या सविस्तर
Rhea Chakraborty (Photo Credit: Instagram)

बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), शहरातील तिच्या राहत्या घरातून गायब (Missing) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी रियाने स्वतः आपण सुशांतची गर्लफ्रेंड असल्याची कबुली दिली होती. आता रियाविरोधात सुशांतच्या वडिलांनी पटनामध्ये एफआयआर (FIR) दाखल केल्यानंतर, पोलिसांनी रियाचा शोध सुरू केला आहे. सुशांतचे वडील कृष्णा कुमार सिंह यांनी एफआयआरमध्ये केलेल्या दाव्यांची चौकशी करण्यासाठी मंगळवारी पाटण्यातील चार सदस्यांच्या पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली आहे.

timesnownews.com च्या वृत्तानुसार, जेव्हा बिहार पोलिसांची टीम रियाच्या निवासस्थानी पोहोचली, तेव्हा रिया तिथे सापडली नाही. पटनाचे राजीव नगर पोलिस स्टेशन प्रभारी योगेंद्र रविदास यांनी मंगळवारी सांगितले की, सुशांतसिंह राजपूत यांचे वडील केके सिंह यांनी आपल्या तक्रारीत चक्रवर्ती हिच्यासह सहा जणांवर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे (एफआयआर क्रमांक 241/20)

सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि अन्य पाच जणांवर आयपीसी कलम, 340, 341, 380, 406, 420 आणि 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे पाटणा मध्यवर्ती विभागातील आयजी संजय कुमार यांनी पाटण्यात पत्रकारांना सांगितले. वृत्तानुसार, रिया सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरविरोधात अटकपूर्व जामीन दाखल करण्याच्या विचारात आहे आणि म्हणूनच ती पोलिसांच्या संपर्कात येत नाही. सुशांतच्या वडिलांनी आपल्या एफआयआरमध्ये काही प्रश्न उपस्थित करत त्याबाबतची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. (हेही वाचा: सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी उपस्थित केले 7 प्रश्न; रिया चक्रवर्तीने लॅपटॉप, दागदागिने, क्रेडिट कार्ड नेले, सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये ट्रान्सफर केले, जाणून घ्या सविस्तर)

यामध्ये सुशांतच्या आर्थिक बाबी, त्याच्यावर झालेले उपचार, औषधे, रियाची त्याच्याशी असलेली वागणूक, इ. गोष्टींचा समावेश आहे. दरम्यान, रिया चक्रवर्ती ही अभिनेता सुशांतसिंह राजपूतला डेट करत होती. दोघेही लवकरच लग्न करण्याचा विचार करत होते. मात्र 14 जून रोजी सुशांतचे निधन झाले. सुशांतच्या पोस्टमार्टम अहवालात त्याच्या मृत्यूचे करण आत्महत्या असे नमूद केले आहे.