Raveena Tandon (Photo Credits: YouTube/T-Series)

बॉलिवूड दिग्दर्शक फराह खान, कॉमेडियन भारती सिंह आणि अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon, Farah Khan, Bharti Singh), या तीनही सेलेब्जविरूद्ध पंजाबच्या अमृतसरमध्ये तक्रार दाखल केली गेली आहे. फराह, भारती आणि रवीना यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

त्यावर प्रतिक्रिया देताना रवीना टंडन हिने माफी मागितली आहे. रवीना टंडनने ट्वीट करत जनतेची माफी मागितली आहे. यावेळी तिने घडल्या प्रकारचा व्हिडीओही शेअर केला आहे. सोबतच कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. या व्हिडीओमध्ये फराह, भारती आणि रवीना 'Hallelujah' शब्दाबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.

रवीना टंडन ट्वीट - 

आपल्या ट्वीटमध्ये रवीना म्हणते, ‘कृपया ही लिंक पहा. कोणत्याही धर्माचा अपमान व्हावा असा कोणताही शब्द मी वापरला नाही. आमच्या तिघींचाही (फराह खान, भारती सिंग आणि मी) कधीच कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, पण जर आम्ही तसे केले तर त्याबद्दल मी मनापासून दिलगीर आहे.’ एका खासगी वेब आणि यूट्यूब वाहिनीसाठी तयार केलेल्या विनोदी कार्यक्रमात ख्रिश्चन धर्माबाबत एका शब्दाचा वापर केला गेला होता. कार्यक्रमात ज्या पद्धतीने हा शब्द वापरला ते म्हणजे थेट धर्माचा अपमान आहे, असा विचार करून ही एफआयआर दाखल केली गेली आहे.

(हेही वाचा: पंजाबमध्ये रवीना टंडन, भारती सिंह आणि फराह खान यांच्याविरोधात FIR दाखल; जाणून घ्या काय आहे आरोप)

ख्रिश्चन मोर्चाचे अध्यक्ष सोनू जफर यांनी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला प्रसारित झालेल्या शोच्या व्हिडिओ फुटेजबद्दल तक्रार केली होती. या व्हिडीओमध्ये असणाऱ्या तिन्ही कलाकारांवर ख्रिश्चनांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता. या घटनेविरुद्ध ख्रिश्चन धर्माशी संबंधित लोकांच्या वतीने ख्रिसमसच्या दिवशी अजनाला येथे निषेध नोंदविला. त्यानंतर पंजाब पोलिसांनी तो व्हिडिओ तपासून एफआयआर नोंदविला. आता याबाबत रवीना टंडनने जनतेची माफी मागितली आहे.