Raj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी
Raj Kundra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पॉर्न फिल्म प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) अडकला आहे. 19 जुलैच्या रात्री मुंबई पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर आता या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे. मीडीया रिपोर्ट्सच्या आधारे मनी लॉड्रिंग प्रकरणामध्ये ईडी (ED) राज कुंद्राची चौकशी करू शकतात. क्राईम ब्रांचला राज कुंद्रा आणि एक साऊथ आफ्रिकन बॅंक अकाऊंट मध्ये संदिग्ध व्यवहारांची माहिती मिळाली आहे. ज्याच्या आधारे आता राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा च्या घरी पोलिस गेले होते त्यावेळी शिल्पाची चौकशी झाली. शिल्पाने या प्रकरणामध्ये तिचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नसल्याचं म्हटलं आहे. काल (24 जुलै) मुंबई पोलिस क्राईम ब्रांचाने पुन्हा एकदा राज कुंद्राचं ऑफिस विआन इंडस्ट्रीज मध्ये छापा मारला आहे. यामध्ये त्यांना काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. एक कपाट देखील सापडले आहे. रिपोर्ट्सच्या आधारे ईडी आता आर्थिक गैरव्यवहारांबाबत चौकशी करू शकते. यामध्ये विदेशी मुद्रा उल्लंघनाचा देखील सहभाग आहे.

दरम्यान राज कुंद्राने जामीनासाठी अर्ज केला आहे.राज कुंद्राने आपली अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत बॉम्बे हाय कोर्टात देखील याचिका दाखल केली आहे. सध्या 27 जुलै पर्यंत राज कुंद्रा पोलिस कोठडीत आहे. आज मुंबई पोलिस अभिनेत्री गहना वशिष्ट सह 3 जणांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.