लता मंगेशकर आणि रामनाथ कोविंद (Photo Credit : Twitter)

भारताची गानकोकिळा अशी ओळख असलेली लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या वयातही अनेक कार्यांमध्ये सक्रीय आहेत. आपले अस्तित्व फक्त चित्रपटसृष्टीपर्यंत मर्यादित न ठेवता सामाजिक मुद्द्यांवरही त्यांनी अनेकदा भाष्य केली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी त्या संपर्कात राहतात. अशा या आपल्या आवाजाने लोकांच्या हृदयाला स्पर्श करणार्‍या लता मंगेशकर यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी भेट घेतली. लता मंगेशकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ही माहिती दिली आहे.

लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी यांच्यासमवेतचा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी कोविंद यांच्या कन्या स्वाति कोविंद, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव आणि त्यांच्या पत्नी विनोदा राव तसेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे आदि मंडळीदेखील उपस्थित होती. रामनाथ कोविंद यांनीदेखील या भेटीदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. लता मंगेशकर यांनी असे सर्व दिग्गज आपल्या घरी आल्याने आपण धन्य झालो असे मत व्यक्त केले आहे. (हेही वाचा: एम एस धोनी याच्या निवृत्ती बद्दल होणार्‍या चर्चेवर लता मंगेशकर यांचे भावनिक ट्विट, टीम इंडियासाठी शेअर केला खास व्हिडिओ)

'आज लता मंगेशकर यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून आनंद झाला. त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या. लता जी हा भारताचा अभिमान आहे. त्यांची हृदयस्पर्शी गाणी आमच्या आयुष्यात मधुरता घेऊन येतात. त्यांचा प्रेरणादायक साधेपणा आणि सौम्यता आपल्या सर्वांना प्रभावित करते. ' अशा शब्दांत रामनाथ कोविंद यांनी या भेटीचे सार मांडले आहे. रामनाथ कोविंद हे राजभवनात भूमिगत 'बंकर म्युझियम' चे उद्घाटन करण्यासाठी मुंबई शहरात होते, या दरम्यान त्यांनी लता मंगेशकर यांची भेट घेतली.