बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दिवसेंदिवस राजच्या अडचणीत वाढ होत आहे. तर शिल्पा शेट्टी आणि कुटुंबियांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, शिल्पा शेट्टीने या प्रकरणी प्रथमच आपलं मौन सोडलं आहे आणि एक स्टेटमेंट (Statement) जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली. (Raj Kundra Pornography Case: पोर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी)
शिल्पा शेट्टी आपल्या निवेदनात म्हणते, "खरंच मागील काही दिवस प्रत्येक बाबतीच आव्हानात्मक होते. अनेक अफवा आणि आरोप यांना सामोरे जावे लागले. माझ्यावर मीडिया आणि शुभचिंतकांकडूनही अनेक अनुचित आरोप करण्यात आले. ट्रोलिंग झाले. फक्त मलाच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप प्रश्न विचारले गेले. परंतु, माझे म्हणणे मी आतापर्यंत मांडले नव्हते आणि यापुढे या विषयावर बोलणे मी टाळणार आहे. कारण हे न्यायालयीन प्रकरण आहे. त्यामुळे माझ्या वतीने चुकीचे बोलणे करणे बंद करा. मी एक सेलिब्रिटी म्हणून एक तत्त्व पाळते- 'कधीच तक्रार करु नका, कधीच स्पष्टीकरण देऊ नका.' मी फक्त इतकेच सांगू शकते की, तपास सुरु आहे. मुंबई पोलिस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे."
शिल्पा शेट्टी ट्विट:
My statement. pic.twitter.com/AAHb2STNNh
— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) August 2, 2021
"कुटुंब म्हणून आम्ही सर्व कायदेशीर उपाय करुन बघत आहोत. पण तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की, अर्धवट माहितीच्या आधारे आणि तथ्य न तपासता कमेंट करणे टाळा. आणि माझ्या मुलांच्या सुरक्षेसाठी आम्हाला आमची प्रायव्हसी जपू द्या. मी कायद्याचे पालन करणारी भारतीय नागरिक असून गेल्या 29 वर्षांपासून मेहनतीने आपले काम करत आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि मी त्यांचा कधीच घात करणार नाही. मी तुम्हाला विनंती करते की, या काळात माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या प्रायव्हसीचा आदर करा," असेही ती पुढे म्हणते.
"मीडिया ट्रायल्स नको. कृपया काय योग्य आणि नाही, हे कायद्याला ठरवू द्या. सत्यमेव जयते," अशाप्रकारे आपल्या भावना व्यक्त करत शिल्पाने कृतज्ञता आणि सकारात्मकतेने पोस्टची सांगता केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा याला 19 जुलै रोजी अटक केली. 10 ऑगस्टपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सातत्याने होत असलेल्या आरोपांवरुन शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा केला होता. मात्र कोर्टाकडून शिल्पाला कोणताही दिलासा मिळाला नाही.