Aamir Khan Quits Social Media: वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी आमिर खानचा सोशल मिडियाला रामराम; शेवटची पोस्ट लिहून घेतला निरोप (See Post)
Aamir Khan (Image Credit: Stock Images)

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) त्याच्या अभिनयाबाबत जगभरात लोकप्रिय आहे, मात्र त्याच्या एका सवयीबद्दल नेहमीच चर्चा होते ती म्हणजे आमिरला लाईमलाईटमध्ये राहायला आवडत नाही. आमिर खानने रविवारी आपला 56 वा वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर दुसर्‍याच दिवशी, सोमवारी त्याने सोशल मीडियाला निरोप देऊन आपल्या चाहत्यांना चकित केले. ट्विटर, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर आमिर खान आता दिसणार नाही. आमिर खानने वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार मानून ही घोषणा केली आहे.

तो म्हणाला की, आता तो आपल्या चाहत्यांशी ज्याप्रकारे पूर्वी संवाद साधत होता त्याच मार्गाने संवाद साधेल. आमिरने आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अलीकडेच 'मिस्टर परफेक्शनिस्ट ऑफ बॉलिवूड'ने आपला आगामी चित्रपट ‘लालसिंग चड्डा’ प्रदर्शित होईपर्यंत आपला फोन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सेटवर सतत फोन वाजत राहिल्याने आपल्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून अमीरने मोबाईलचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला.

आज आमिर खानने आपले निवेदन प्रसिद्ध करुन म्हटले आहे, 'मित्रांनो, माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्छा आणि प्रेम दिल्याबद्दल खूप आभार. माझे हृदय भरून आले. दुसरी बातमी अशी आहे की सोशल मीडियावरील ही माझी शेवटची पोस्ट असेल. तसेही मी या माध्यमावर फारसे सक्रिय नसलो तरी मी त्याच्यापासून दूर राहण्याचे निश्चित केले आहे. ज्याप्रकारे आपण पूर्वी बोलत होतो तसेच इथून पुढे बोलू. यासह, एकेपी (आमिर खान प्रॉडक्शन) ने स्वत: चे अधिकृत चॅनेल तयार केले आहे, त्यामुळे भविष्यात तुम्हाला माझ्या चित्रपटांचे अपडेट्स त्याचे हँडल @akppl_official वर मिळतील. भरपूर प्रेम.' (हेही वाचा: बॉलिवूड अभिनेता Sonu Sood देणार 1 लाख लोकांना नोकरी; 10 कोटी तरुणाचं भविष्य बदलवण्याचा केला दावा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्लान)

2018 मध्ये, आमीरने आपल्या वाढदिवसा दिवशी आपल्या आईचा फोटो शेअर करून इंस्टाग्रामवर डेब्यू केला होता. दरम्यान, आमिर खान सध्या यावर्षी ख्रिसमसवर रिलीज होणाऱ्या 'लालसिंग चड्ढा' या आगामी चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन आहेत. या चित्रपटात करीना कपूर आणि मोना सिंग यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट हॉलिवूड सुपरहिट 'फॉरेस्ट गंप' (1994) चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात, आमिरची व्यक्तिरेखा टॉम हॅन्क्सने साकारली होती आणि त्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.