सैराटच्या अभूतपूर्व यशामुळे घराघरात नाव पोहचलेले, दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) लवकरच 'झुंड' (Jhund) सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झुंड हा नागराजचा पहिला हिंदी चित्रपट आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. ‘झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन फूटबॉल प्रशिक्षण विजय बरसे यांची भूमिका साकारत आहेत. विजय बरसे हे झोपडपट्टीतील तरुणांना फूटबॉलचे प्रशिक्षण देत असतात. मात्र आता हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. चित्रपट निर्माते नंदी कुमार यांनी कॉपीराईटचे उल्लंघन केल्याबद्दल. नागराज मंजुळे यांच्यासह आणि अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
चित्रपट निर्माते नंदी कुमार हे हैद्राबादचे मोठे निर्माते आहेत. त्यांनी झुंड चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे, टी-सीरीजचे अध्यक्ष भूषण कुमार, अमिताभ बच्चन आणि चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारित आहेत ते विजय बरसे यांना ही नोटीस पाठवली आहे. टी-सिरीजने याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यातून कोणत्याही गोष्टीचा बोध होत नाही असे कुमार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कुमार यांनी चित्रपटगृह, टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. (हेही वाचा: Big B यांचा खूप दिवसानंतर गावातील बैलगाडीतून प्रवास, दिला जुन्या आठवणींना उजाळा)
मिळालेल्या माहितीनुसार, झुंड हा चित्रपट झोपडपट्टीमध्ये राहणार्या मुलांना फूटबॉलचे धडे देणारा प्रशिक्षक विजय बरसे यांच्या जीवनकथेवर आधारित आहे. 2017 साली कुमार यांनी स्लम सॉकर खेळाडू अखिलेश पॉलच्या जीवनावर आधारीत चित्रपट काढण्यसाठी हक्क विकत घेतले आहेत. झोपडपट्टीमध्ये राहणारा अखिलेश कसा मोठा फुटबॉलपटू बनतो ही कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. 11 जून 2018 रोजी कुमार यांनी या चित्रपटाच्या कथेची अधिकृतरित्या तेलंगणा सिनेमा रायटर असोसिएशनकडे नोंद केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मात्र आता नागराज मंजुळे हे अखिलेशचे प्रशिक्षक विजय बरसे यांच्यावर चित्रपट बनवत आहेत. चित्रपटात विजय बरसेसह अखिलेश पॉलचा जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे. म्हणूनच कुमार यांनी फसवणुकीचा दावा ठोकत कोर्टात धाव घेतली आहे. नागराज मंजुळे आणि चित्रटातील काही व्यक्तींवर कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.