जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत निसर्गप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली नव्या उपक्रमाची घोषणा, वाचा सविस्तर
Sayaji Shinde (Photo Credits: Instagram)

मराठी सिनेमांपासून ते बॉलिवूड, टॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवलेले लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी आज जागतिक पर्यावरण दिनाचे (World Environment Day) औचित्य साधून एका नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. सह्याद्री देवराई आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सयाजी शिंदे यांनी हा उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमा अंतर्गत दुर्मिळ प्रजातींचे वृक्ष आणि वेलींचं संगोपन आणि संवर्धन कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सयाजी शिंदे यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

टिव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, पहिल्या पावसाच्या आगमनानंतर बोरीवलीतील नॅशनल पार्क इथं कृष्णवड, तेंदु, अजानवृक्ष, हुंब यासारख्या 22 दुर्मिळ देशी प्रजातींची लागवड केली जाणार आहे. तसंच हिरडा, बेहेडा, मुचकुंद अशा अनेक औषधी वनस्पती आणि वेलींयुक्त बोटोनिकल गार्डन, शाश्वत आठवणींचा वारसा जपण्याच्या हेतूने उभारण्यात येणारी वृक्षरुपी ऑक्सिजन बँक यांचा या उपक्रमात समावेश असणार आहे.हेदेखील वाचा- Sherni Trailer: विद्या बालन स्टारर 'शेरनी' चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर प्रदर्शित, नक्की पाहा

जास्तीत जास्त लोकांनी या कार्यात सहभागी व्हावं यासाठी सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी या कार्यक्रमात अर्थदान, श्रमदान, वृक्षदान आणि बीजदानाच्या स्वरुपात अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत. या पर्यायांच्या माध्यमातून लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय.