Kavya Thapar (संग्रहित संपादित प्रतिमा)

जुहू पोलिसांच्या (Juhu Police) महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी टॉलिवूड अभिनेत्री काव्या प्रवीण थापरला (Kavya Thapar) मुंबई पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अभिनेत्रीला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर दारूच्या नशेत कार चालवण्याचा आणि एका व्यक्तीच्या वाहनाला धडक दिल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अभिनेत्रीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तिने पोलिसांना धक्काबुक्की केली आणि अपशब्द वापरले. आता तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुहू पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्री एका पंचतारांकित हॉटेलमधून बाहेर आली व तिने एका कारला धडक दिली. कारच्या मालकाने तिला थांबवल्यावर अभिनेत्रीने रस्त्यावर गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. यावेळी मद्यधुंद अभिनेत्रीने कार मालकाशी असभ्य वर्तन तर केलेच पण तिने पोलिसांनाही शिवीगाळही केली. अधिकाऱ्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तिने मारहाण करायला सुरुवात केली.

त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून तीला अटक केली. काव्याला मुंबईच्या अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले, तेथून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काव्या प्रामुख्याने साऊथ सिनेमात काम करते. 'तत्काळ' या शॉर्टफिल्ममधून तिने करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने Ee Maaya Peremito मधून तेलुगू सिनेमात पदार्पण केले, ज्यामध्ये ती शीतल जैनच्या भूमिकेत होती. यानंतर ती ‘Market Raja MBBS’ मधून कॉलिवूड म्हणजेच तमिळ सिनेमात आली. ती शेवटची टॉलिवूड फिल्म 'एक मिनी कथा' मध्ये दिसली होती. (हेही वाचा: Sunny Leone PAN: सनी लियोन हिच्या पॅन क्रमांकाचा चुकीचा वापर, ऑनलाईन फसवणूक करुन घेतले कर्ज, सिबील स्कोर खराब)

26 वर्षीय काव्या लवकरच अभिनेता विजय अँटोनीसोबत दिसणार आहे, परंतु तिच्या आगामी प्रोजेक्टचे टायटल जाहीर करण्यात आलेले नाही. काव्या थापरचा जन्म 20 ऑगस्ट 1995 रोजी महाराष्ट्रात झाला. तिचे शालेय शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून पूर्ण झाले. तिने ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे.