ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेली सैफ अली खान स्टारर 'तांडव' (Tandav) वेब सिरीजबाबतचा वाद आणखीनच तीव्र होत आहे. या वेब सिरीजवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, अॅमेझॉन प्राइमचीच आणखी एक वेब सीरिज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेली ‘मिर्झापूर' (Mirzapur) वेबसिरीज आता अडचणीत सापडली आहे. मिर्झापूर वेब सिरीजबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर मिर्झापूरचे दोन सीझन आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यातील चिलबिलिया भुइली येथे राहणारे अरविंद चतुर्वेदी यांनी निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
वेब सीरिजवर मिर्झापूरची प्रतिमा डागाळल्याचा आरोप आहे. निर्मात्यांनी मिर्झापूरच्या प्रतिमेचे चुकीचे दर्शन घडवल्याचे मत अरविंद चतुर्वेदी यांनी व्यक्त केले आहे. या सिरीजमुळे त्यांच्या धार्मिक, प्रादेशिक आणि सामाजिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासह, वेब सीरिजमध्ये अत्यंत गैरवर्तन आणि अवैध संबंध देखील दर्शविले गेले आहेत, जे समाजाला चुकीचा संदेश देतात. अरविंद चतुर्वेदी यांच्या निवेदनाच्या आधारे तक्रार दाखल केली असून कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे. (हेही वाचा: तांडव सीरिजमुळे निर्माण झालेल्या वादानंतर अखेर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे म्हणत मागितली माफी)
गेल्या वर्षभरापासून 'मिर्झापूर' वेब सिरीज तिच्या संवादांमुळे चर्चेत आणि वादात आहे. मिर्झापूरचे खासदार आणि अपना दलचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुप्रिया पटेल यांनीही या वेब सिरीजवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून 'तांडव' या मालिकेवरून सुरू असलेल्या वादानंतर, आता निर्माता अली अब्बास जफरने आपले संपूर्ण कलाकार आणि क्रूच्या वतीने माफी मागितली आहे. आपला हेतू कोणाचाही अवमान करण्याचा नव्हता किंवा कोणत्याही धर्माचा आणि राजकीय पक्षाचा अपमान करायचा नव्हता असे त्यांनी सांगितले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे.