Lata Mangeshkar Birthday Special: दोन वेळा प्रेम होऊनही लता मंगेशकर राहिल्या अविवाहीत; जाणून घ्या कोण होत्या त्या व्यक्ती
लता मंगेशकर वाढदिवस विशेष (संग्रहित संपादित प्रतिमा)

स्वर कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) फक्त देशातच नाही, तर संपूर्ण जगामध्ये आपल्या गायनासाठी प्रसिद्ध आहेत. लता मंगेशकर हे एक असे नाव आहे ज्याने भारताचे नाव अभिमानाने उंचावले आहे. आज, 28 सप्टेंबर 2019 रोजी लता मंगेशकर 90 वर्षांच्या होणार आहेत. 70 दशकाहून अधिक काळ त्यांनी लोकांच्या मनावर आपल्या गायकीने अधिराज्य गाजवले आहे. 90 चा उंबरठा गाठणाऱ्या लता दीदी अजूनही अविवाहित आहेत. लहान वयात कुटुंबाची जबाबदारी, पुढे ज्या व्यक्तींवर प्रेम झाले त्याच्याशी नाते जोडू शकले नाही अशा कारणांमुळे त्या अजूनही अविवाहित राहिल्या. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊन त्यांच्या प्रेमकहाणी (Lata Mangeshkar Love Story) बद्दल

संगीतकार सी.रामचंद्र (C. Ramchandra) यांच्या यशामध्ये लता मंगेशकर यांचा प्रचंड मोठा वाटा आहे. लतासोबत त्यांची जोडी हिट ठरल्यानंतर, दोघांच्या जवळीकतेच्या चर्चा सुरु झाल्या. लता मंगेशकर याबाबत कधीही उघडपणे बोलल्या नाहीत. मात्र असे सांगितले जाते की सी. रामचंद्र यांच्या व्यक्तिमत्वाचा फार मोठा प्रभाव लता मंगेशकर यांच्यावर होता. लता मंगेशकर सी. रामचंद्र यांना पसंतही करत होत्या. रामचंद्र यांना लताशी लग्न करायचे होते मात्र लताने त्याला नकार दिला होता. सी. रामचंद्र यांचे आधीच लग्न झाले होते हे यामागील प्रमुख कारण होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लता यांनी नकार दिल्यावर सी. रामचंद्र यांनी आपली दुसरी मैत्रीण शांता हिच्याशी दुसरा विवाह केला. (हेही वाचा: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 'Daughter Of The Nation' या किताबाने सन्मानित करणार सरकार)

लता मंगेशकर यांच्याबाबत अजून एक किस्सा सांगितला जातो. लता मंगेशकर डूंगरपूर राजघराण्यातील महाराज राज सिंह यांच्यावर प्रेम करत होत्या. हृदयनाथ मंगेशकर आणि राज सिंह हे एकमेकांचे चांगले मित्र होते. राज वकिलीचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांची लताशी भेट झाली. भेटीचे रुपांतर कधी प्रेमात झाले हे दोघांनाही समजले नाही. चित्रपट सृष्टीमध्ये त्यावेळी लताचे नाव झाले होते त्यामुळे या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीमध्येही रंगू लागली. राज हे कुटुंबातील सर्वात लहान होते. राज यांनी आपल्या पालकांना वचन दिले होते की, ते कोणत्याही सामान्य घरातील मुलीला आपल्या कुटुंबाची सून करणार नाही. राज यांनी मृत्यूपर्यंत हे वचन पाळले. आश्चर्य म्हणजे लताप्रमाणेच राजही आयुष्यभर अविवाहित राहिले.