Deepika Padukone, Karishma Prakash (Photo Credits: File Image)

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर बॉलिवूड मध्ये सध्या ड्रग्ज प्रकरणाची (Drugs Case) चौकशी सुरु आहे. याआधी एनसीबीने (NCB) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर अशा काही लोकप्रिय अभिनेत्रींची या प्रकरणामध्ये चौकशी केली आहे. आता दीपिका पदुकोणच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश (Karishma Prakash) हिच्या घरावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्माच्या घरातून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतर आता करिश्माला पुढील चौकशीसाठी एनसीबीने समन्स बजावला आहे. एनसीबीने यापूर्वी दोनदा करिश्माची चौकशी केली होती. एकदा करिश्मासमोर दीपिका पादुकोणची चौकशी करण्यात आली होती.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एफआयए 16/20 च्या रिया चक्रवर्ती प्रकरणात करिश्मा प्रकाश हिचे नाव अनेक ड्रग पेडलर्सच्या चौकशीत पुढे आले होते, त्याच आधारावर आज एनसीबीने तिच्या घरी छापा टाकला होता. एफआयआर 16/20 प्रकरणात अटक केलेल्या पेडलर्सच्या चौकशीत आणि तांत्रिक डेटाच्या आधारे एनसीबीला अशी माहिती मिळाली की, करिश्मा प्रकाश या ड्रग्ज पेडलर्सचा नियमित संपर्कात होती. याआधी करिश्मा आणि दीपिका पादुकोण यांच्यात ड्रग्ज संबंधी झालेले चॅट समोर आले होते, त्याच आधारावर एनसीबीने चौकशी केली होती.

आता आज करिश्माच्या घराच्या झडतीमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे ड्रग्ज सापडले आहेत पण ते अल्प प्रमाणात आहेत. करिष्मा प्रकाश हिला उद्यासाठी समन्स बजावले असल्याचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले. छापेमारी दरम्यान करिश्मा आपल्या घरी नव्हती. समीर वानखेडे पुढे म्हणाले, ‘आम्ही करिश्माचे समन्स, करिश्माचे शेजारी, कार्यालय आणि ओळखीच्या सर्वांना कळविले आहे. उद्या सकाळी तिला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.’ (हेही वाचा: सुशांतची बहिण प्रियंका, मितू यांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यासाठी रिया चक्रवर्ती हिची बॉम्बे हायकोर्टाला विनंती)

दरम्यान, दीपिकाचा मॅनेजर म्हणून काम करणारी करिश्मा प्रकाश ‘क्वान’ नावाच्या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीत काम करते. ही कंपनी 40 बॉलिवूड सेलिब्रिटींना टॅलेंट मॅनेजर पुरवते. रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया साहाही याच कंपनीत काम करते.