कंगना रनौत आणि बीएमसीचे अधिकारी (Photo Credits: Instagram/ Yogen Shah)

कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या कार्यालय आणि बंगल्यावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या तोडक कारवाईविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) आज निर्णय दिला. न्यायमूर्ती एस.जे. कठवल्ला आणि न्यायमूर्ती आर.आय. चगला यांचे खंडपीठासमोर आज सकाळी यावर 11 वाजता निर्णय देण्यात आला. कोर्टाने दिलेल्या निर्णयात असे म्हटले आहे की, "आम्ही सर्व फोटोज पाहिले, बांधकामाची पाहाणी केली. यावरुन असे प्रतित होते की, येथे कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम नव्हते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने उचलेले पाऊल बेकायदेशीर होते." तसंच कंगना रनौत सरकारविरुद्ध सोशल मीडियावर करत असलेल्या पोस्टवरुन कोर्टाने तिला समज दिली आहे.

BMC ने 7 आणि 9 सप्टेंबर रोजी कंगना रनौत हिला जारी केलेल्या नोटीसा खारीज करत मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रनौत हिच्या घरावर केलेली तोडक कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे कंगनच्या प्रॉपर्टीच्या झालेल्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी अधिकारी नेमण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. या अधिकाऱ्याने कोर्टाला एक रिपोर्ट सुपूर्त करणे अपेक्षित आहे. त्या रिपोर्टची पाहणी करुन कंगना रनौत हिला नुकसान भरपाई देण्याचे आदेश जारी करण्यात येतील. तसंच कोर्टाने कंगना रनौतला सरकार आणि इतर व्यक्तींविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करण्याबाबत समज दिली आहे.

ANI Tweet:

कंगना रनौत हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि तिच्यातील वाद शिगेला पोहचला. त्यानंतर बीएमसीने कंगनाच्या बंगला आणि ऑफिसच्या अवैध कामावर हातोडा मारला होता. या तोडक कारवाईत 2 कोटीचे नुकसान झाले असून त्याची भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी करणारी याचिका कंगनाने मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर कंगना रनौत हिने बॉलिवूडमधील अनेक मुद्दांवर बेधडक भाष्य केले. त्याचबरोबर मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली. दरम्यान, तिच्या टीकात्मक ट्विट्सची मालिका सुरुच राहिली. या ट्विटमधून सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगना आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्यावर करण्यात आला आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांना तीनदा समन्स बजावला असून अद्याप त्या चौकशीसाठी हजर झालेल्या नाहीत.